आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) 16 धावांनी पराभूत केले. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल्सने 217 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल चेन्नईला 6 गडी गमावल्यानंतर 200 धावा करता आल्या. आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा हा धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 28 मार्च 2010 रोजी अहमदाबादमध्ये त्यांचा 17 धावांनी पराभव झाला होता.
रॉयल्सच्या विजयाचे नायक युवा फलंदाज संजू सॅमसन आणि फिरकीपटू राहुल तेवटीया हे ठरले. सॅमसनने 32 चेंडूंत 74 धावा फटकावल्या. तेवटीयाने चेन्नईच्या तीन खेळाडूंना बाद केले.
तेवटीयाचे 3 बळी ठरले टर्निंग पॉइंट
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन (33) आणि मुरली विजय (२१) यांनी जोरदार सुरुवात केली, पण 7 व्या षटकात खेळाची स्थिती बदलली, फिरकीपटू राहुल तेवटीयाने त्याचा पहिल्याच षटकात वॉटसनला बाद केले. त्यानंतर दुसर्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सॅम करन (17) आणि ऋतुराज गायकवाड यांना लागोपाठच्या चेंडूंवर तंबूत पाठवले.
युएईमधील आयपीएलचे सर्व मोठे लक्ष्य
राजस्थान रॉयल्सने 7 गडी गमावत 216 धावा केल्या होत्या. ही यूएईमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2014 रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईविरुद्ध 206 धावा केल्या होत्या.
पहिल्या डावातील शेवटचे षटकदेखील ठरला टर्निंग पॉइंट, आर्चरने केल्या 27 धावा
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या षटकांत 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जोफ्रा आर्चरने 8 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात 30 धावा केल्या. लुंगी एन्गिडीच्या त्या षटकात आर्चरने 4 षटकार ठोकले. हादेखील सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. या खेळीमुळे रॉयल्सने 7 गडी गमावत 216 धावा केल्या. शेवटच्या षटकांत इतक्या धावा आल्या नसत्या तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. चेन्नईकडून सॅम करनने 3 गडी बाद केले, तर दीपक चहर, एन्गिडी आणि पियुष चावलाने 1-1 गडी बाद केले.
धोनीचा झाला वाद –
धोनी सामन्यात पुन्हा एकदा पंचांशी वादविवाद करतांना दिसला. झाले असे की राजस्थानच्या डावात 18 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर टॉम करनने फटका मारला आणि चेंडू यष्टीरक्षक धोनीच्या हाती पोहोचला. त्यावेळी धोनी आणि चेन्नईच्या खेळाडूंनी विकेटसाठी अपील केले. धोनीच्या अपीलावर पंच सी शमशुद्दीनने टॉम करनला बाद दिले. पण करनला असा संशय होता की धोनीने योग्यरित्या झेल घेतला नाही, परंतु राजस्थान रॉयल्स संघाकडे असलेले डीआरएस शिल्लक नव्हते.
अशा परिस्थितीत करन पंचांशी जाऊन बोलला. त्यानंतर शमशुद्दीन लेग-अंपायर विनीत कुलकर्णीशी बोलले, ते देखील धोनीने हा झेल नीट पकडला की नाही हे समजू शकले नाही. त्यानंतर हे प्रकरण तिसर्या पंचाकडे पाठवले गेले. हे टीव्हीवर पहात असतानाच धोनीने जमिनीवरून चेंडू पकडला हे सिद्ध झाले. अशा परिस्थितीत करनला नाबाद देण्यात आले. पण आधी दिलेला निर्णय अचानक बदलला गेल्याने धोनी मैदानातील पंचाजवळ गेला आणि त्यांच्याशी वाद घालताना दिसला.
मागीलवर्षी देखील राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यानच धोनी पंचांशी वाद घालताना दिसला होता.
डोक्याच्या दुखापतीनंतर परतला स्मिथ
या हंगामातील हा राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना होता. यात हा संघ आपला नियमित कर्णधार स्टीव्ह स्मिथसह मैदानात उतरला. याच महिन्यात, स्मिथच्या डोक्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळू शकला नव्हता. त्यानंतर आता त्याने आयपीएलमधून दुखापतीनंतर पुनरागमन केले.
बटलर आणि स्टोक्स खेळू शकले नाही सामना
राजस्थान रॉयल्सचे महत्त्वाचे खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स आणि फलंदाज जॉस बटलर पहिल्या सामन्यात खेळू शकले नाहीत. बटलर कुटूंबासह युएईमध्ये आहे. या कारणास्तव ते क्वारंटाईनमध्ये 6 दिवस घालवतील. स्टोक्सच्या वडिलांना मेंदूचा कर्करोग आहे. या कारणास्तव तो त्यांच्या उपचारासाठी क्राइस्टचर्चमध्ये आहे. त्यामुळे तो युएईमध्ये अद्याप दाखल झालेला नाही.