राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई संघाला पराभूत करून पहिला विजय मिळविला आहे .आज, 27 सप्टेंबर रोजी राजस्थानचा दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे. त्याआधी या संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर स्टार फलंदाज जॉस बटलर संघात सामील होण्यास सज्ज झाला आहे.
सध्या तो नेटमध्ये सराव करत आहे. सरावादरम्यान बोलतांना तो म्हणाला, “माझा पहिला सामना खेळण्यास मी उत्सुक आहे, खेळाडूंबरोबर सराव करून चांगल वाटलं. संघात एक सकारात्मक उर्जा आहे त्यामुळे मला मैदानात उतरण्याची खरोखरच उत्सुकता आहे. पहिल्या सामन्यानंतर आत्मविश्वास वाढला हे स्पष्ट आहे. इतर खेळाडूंच्या सहवासात राहून आनंद झाला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध स्पर्धात्मक सामना होईल याची मला अपेक्षा आहे.”
किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आरसीबीविरुद्ध तुफान फटकेबाजी केली होती. त्याने 69 चेंडूत तब्बल 132 धावा केल्या होत्या.
केएल राहुलची प्रशंसा करतांना बटलर म्हणाला, “राहुलने आरसीबीविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळली. नेहमीप्रमाणे यंदासुद्धा त्याची विकेट खूप महत्वाची ठरणार आहे. आजचे मैदान लहान आहे. मैदानात रात्री दव पाहायला मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी धावसंख्या होईल ही अपेक्षा आहे.”
महत्त्वाचे म्हणजे बटलरच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सने चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि स्टीव्ह स्मिथ यांना सलामीला पाठविले होते. पण बटलरच्या पुनरागमनानंतर स्मिथ मधल्या फळीत फलंदाजी करतांना दिसू शकतो. स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली होती.






