शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा ५१ वा सामना मंगळवारी (५ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला २० षटकांत ९ बाद ९० धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने मुंबईसमोर विजयासाठी ९१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने ८.२ षटकात २ विकेट्स गमावत ९४ धावा करुन पूर्ण केला.
मुंबईकडून ९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने इशान किशनसह शानदार सुरुवात केली होती. पण रोहित चौथ्या षटकात १३ चेंडूत २२ धावांवर बाद झाला. त्याला चेतन साकारियाने बाद केले. त्यानंतर सूर्यकुमारनेही आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने १३ धावांवर ६ व्या षटकात मुस्तफिजूरविरुद्ध खेळताना महिपाल लोमरोरकडे झेल देत विकेट गमावली.
पण त्यानंतर इशान किशनने हार्दिक पंड्याला साथीला घेत आणखी पडझल होऊ न देता मुंबईला विजयापर्यंत नेले. मुंबईला ९ व्या षटकात विजयासाठी २ धावांची गरज असताना इशानने षटकार मारला आणि मुंबईला विजय मिळवून देत वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले. त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ५० धावा केल्या, तर हार्दिक ५ धावांवर नाबाद राहिला.
मुंबईचे वेगवान आक्रमण चमकले
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत राजस्थानवर वर्चस्व राखले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानकडून एविन लुईस आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केली. या दोघांची जोडी फार काळ टिकली नाही. चौथ्या षटकात जयस्वाल १२ धावांवर नॅथन कुल्टर-नाईलविरुद्ध खेळताना बाद झाला. पाठोपाठ ६ व्या षटकात लुईसला जसप्रीत बुमराहने २४ धावांवर पायचीत केले.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनही काही कमाल करु शकला नाही. तो ७ व्या षटकात ३ धावांवर जिमी निशामच्या चेंडूवर जयंत यादवकडे झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ शिवम दुबेला ९ व्या षटकात ४ धावांवर निशामने त्रिफळाचीत केले. तर, १० व्या षटकात कुल्टर-नाईलने संयमी खेळ करणाऱ्या ग्लेन फिलिप्सला माघारी धाडले. त्याने १३ चेंडूत ४ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने १० षटकांत ५० धावांवर ५ विकेटस गमावल्या होत्या.
त्यानंतरही राजस्थानचे फलंदाज फार काही करु शकले नाहीत. डेविड मिलर आणि राहुल तेवातियाने थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, ते देखील फार काळ टिकू शकले नाहीत. तेवातियाला १२ धावांवर जिमी निशामने यष्टीरक्षक इशान किशनकडे १५ व्या षटकात झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर श्रेयस गोपाळला १६ व्या षटकात जसप्रीत बुमराहने बाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर डेविड मिलर १५ धावांवर १७ व्या षटकात नॅथन कुल्टर-नाईलविरुद्ध खेळताना पायचीत झाला. तर १९ व्या षटकात कुल्टर-नाईलनेच चेतन साकारियाला ६ धावांवर त्रिफळाचीत केले. अखेर मुस्तफिजूर रेहमानने एक षटकारासह नाबाद ८ धावा करत राजस्थानला ९० धावांपर्यंत पोहचवले.
मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच जिमी निशामने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघात २ बदल
या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात दोन्ही संघांनी २-२ बदल केले आहेत. मुंबईच्या संघाच इशान किशनचे पुनरागमन झाले आहे. त्याला क्विंटॉन डीकॉकऐवजी स्थान देण्यात आले आहे. तसेच कृणाल पंड्याऐवजी जिमी निशामला संघात सामील करण्यात आले आहे. तसेच राजस्थानने अंतिम ११ जणांच्या संघात मंयक मार्कंडे ऐवजी श्रेयस गोपाळला संधी मिळाली आहे, तर आकाश सिंग ऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, श्रेयस गोपाळ, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकरीया
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, जिमी निशाम, नॅथन कूल्टर-नाईल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट