इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) चौदावा हंगाम अखेरीकडे आला आहे. या स्पर्धेच्या समाप्तीनंतर दोन दिवसातच टी२० विश्वचषकाला सुरुवात होईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघाची यापूर्वीच घोषणा झाली आहे. मात्र, या विश्वचषकासाठी निवड झालेल्यांपैकी काही खेळाडू आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसत आहेत. त्या खेळाडूंवर आता भारताचे माजी कर्णधार व दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.
गावसकरांची मुंबईच्या त्रिकुटावर टीका
भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर हे सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना, भारतीय संघाचा अष्टपैलू व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हार्दिक पंड्याविषयी बोलताना म्हटले,
“हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही हा केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नाही तर भारतासाठीही मोठा धक्का आहे. कारण, त्याला संघात अष्टपैलू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. जर तुम्ही संघात असाल व सहा किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असाल आणि तुम्ही गोलंदाजी करत नसाल, तर कर्णधारासाठी गोष्टी कठीण होतात.”
हार्दिकवर दोन वर्षापूर्वी पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्याने अत्यंत कमी गोलंदाजी केली आहे.
इशान व सूर्यकुमार सहजतेने घेत आहेत गोष्टी
गावसकर यांनी यादरम्यान भारतीय संघात निवड झालेल्या मुंबईच्याच सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले,
“सुर्यकुमार व ईशान भारतीय संघात निवड झाल्यानंतर गोष्टी अधिक सहजतेने घेऊ लागले आहेत. तुम्ही विश्वचषकासाठी निवड झालेले खेळाडू आहात. त्यामुळे, तुम्ही अधिक जबाबदारीने खेळायला हवे.”
सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या उत्तरार्धात सूर्यकुमार व ईशान काहीसे खराब फॉर्ममध्ये दिसत आहेत. सूर्यकुमार हा सहा सामन्यात एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. तर, दोन सामन्यात बाकावर बसल्यानंतर ईशानने शानदार पुनरागमन करत राजस्थानविरुद्ध तुफानी नाबाद अर्धशतक झळकावले आहे.






