आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 193 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान संघाने 20 षटकांत केवळ 136 धावा केल्या. या सामन्यात 8 विक्रमांची नोंद करण्यात आली. या लेखात आपण या विक्रमांवर नजर टाकणार आहोत.
• मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात 2 षटकार ठोकले. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये आपले 50 षटकार पूर्ण केले आहेत.
• आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 11 सामने मुंबई इंडियन्सने तर 11 सामने राजस्थान रॉयल्सने जिंकले होते. या दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित होता. हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने राजस्थान विरुद्ध 12 वा विजय नोंदविला आहे.
• या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत आयपीएलच्या कारकिर्दीतील 8 वे अर्धशतक ठोकले.
• हा सामना जिंकून मुंबईने राजस्थानविरुद्ध 2018 नंतर पहिल्यांदाच विजय मिळवला. राजस्थान विरुद्ध मागील दोन हंगामात खेळलेल्या 4 सामन्यात मुंबई संघ 4 वेळा पराभूत झाला होता.
• या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने आयपीएल कारकिर्दीतील पहिला बळी घेतला. कार्तिकने मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याला बाद केले.
• हा सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे. या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्स संघ अव्वल स्थानी होता.
• आयपीएल 2020 मध्ये मुंबईचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून 18 बळी घेतले आहेत.
• या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जॉस बटलरने आयपीएल कारकीर्दीत 10 वे अर्धशतक झळकावले. बटलरने 44 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तो आयपीएलमध्ये 10 अर्धशतके करणारा पहिलाच इंग्लंडचा क्रिकेटपट ठरला आहे.






