सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऋतुराज गायकवाड सारख्या अनेक शानदार खेळाडूंची निवड झालेली नाही. हे खेळाडू आता रणजी ट्रॉफीमध्ये आपला जलवा दाखवत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळू शकते.
रणजी ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व करत आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यात दुसऱ्या राऊंडचा सामना खेळला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋतुराजनं शानदार शतक झळकावलं. त्यानं मुंबईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. विशेष म्हणजे, ऋतुराजचं शतक 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं आलं आहे.
ऋतुराजनं महाराष्ट्रासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकलं. पहिल्या डावात तो सलामीला आला होता. मात्र तो केवळ 2 चेंडू खेळून बाद झाला. शार्दुल ठाकूरनं त्याची विकेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात तो वन डाऊन आला आणि त्यानं फक्त 87 चेंडूत शतक ठोकलं. त्यानं जवळपास 115 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीचं 7वं शतक आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडकर्ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ऋतुराजकडे पर्यायी सलामीवीर म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच त्याला बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेऐवजी इराणी चषकात खेळण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र या जागेसाठी अभिमन्यू ईश्वरननं देखील आपला दावा ठोकला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलामीला येऊन खोऱ्यानं धावा गोळा करतोय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची पर्यायी सलामीवीर म्हणून जागा पक्की असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत आता जर ऋतुराजनं मधल्या फळीत धावा केल्या, तरच त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होऊ शकते.
हेही वाचा –
रमणदीप जोमात, पाकिस्तान कोमात, भारताच्या खेळाडूचा हवेत उडी मारत अप्रतिम झेल! पाहा VIDEO
जगाला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, या दोन संघांमध्ये विजेतेपदाची टक्कर
टीम इंडियाने 100 वर्ष जुना विश्वविक्रम मोडला, भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम