---Advertisement---

संकटमोचक ऋतुराज गायकवाड! विजय हजारे ट्रॉफीमध्ये मारला शतकांचा ‘चौकार’

On: शुक्रवार, डिसेंबर 2, 2022 1:13 PM
Ruturaj Gaikwad
---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानाची स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 2022च्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (2 डिसेंबर) महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात खेळला गेला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यामध्येही महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्या शतकांचा धमाका सुरूच आहे.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने विजय हजारे ट्रॉफी 2022च्या हंगामात आतापर्यंत चार शतके केली आहेत. ही शतके त्याने अंतिम, उपांत्य, उपांत्यपूर्व आणि साखळी फेरी यांमध्ये केली आहेत. त्याने अंतिम सामन्यात 131 चेंडूत 108 धावा केल्या. त्याआधी त्याने उपांत्य सामन्यात आसामविरुद्ध 126 चेंडूत 168 धावा केल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत तर त्याने द्विशतकी खेळी करत एका षटकात 7 षटकार मारण्याचा विक्रमही केला होता. त्याने उत्तर प्रदेश विरुद्ध 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या 25 वर्षीय ऋतुराजने या स्पर्धेच्या 2022च्या हंगामात  220च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. त्याने 5 सामन्यात 660 धावा केल्या आहेत.

विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तमिळनाडुचा एन जगदीसन पहिल्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यात 830 धावा केल्या असून त्यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे. या यादीत ऋतुराज दुसऱ्या स्थानावर आहे.

ऋतुराज आणि रेकॉर्ड
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 12 शतके करण्याची कामगिरी ऋतुराजच्या नावावर आहे. त्याच्याआधी रॉबिन उथप्पा याने या स्पर्धेत 11 शतके केली होती. ऋतुराजने 2021पासून या स्पर्धेत 10 डावांमध्ये खेळताना 7 शतके आणि एक द्विशतक केले आहे.

या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करणारा ऋतुराज एकमेव.

ऋतुराजने लिस्ट ए क्रिकेटच्या 71 सामन्यात 60.40च्या सरासरीने 3926 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

अंतिम सामन्यात जेव्हा एका बाजूने विकेट जात होत्या तेव्हा ऋतुराजने एक बाजू लढवत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याने धावबाद होण्याआधी 131 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या साहाय्याने 108 धावा केल्या. यामुळे महाराष्ट्राने 50 षटकात 9 विकेट्स गमावत 248 धावसंख्या उभारली. आझिम काझी यानेही 33 चेंडूत 37 धावा केल्या.

सौराष्ट्रकडून सर्वाधिक विकेट्स चिराग जानी (Chirag Jani) याने घेतल्या. त्याने 49व्या षटकात हॅट्ट्रीक घेतली. या सामन्यात त्याने 10 षटकात 43 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. Ruturaj Gaikwad Century Against Saurashtra in Vijay Hazare Trophy Final 2022

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विश्वविक्रमी’ रावळपिंडी टेस्ट! पाकिस्तानवर बझबॉल भारी, इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला पहिला दिवस
स्पर्धा भारताची दबदबा विदेशी खेळाडूंचा! बेस प्राईजची रक्कम वाचून बसेल धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---