भारतीय क्रिकेट संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. एकीकडे भारताचा मुख्य संघ विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि पुढील कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसरीकडे युवा खेळाडूंची भरमार असलेला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्याच्या तयारीत आहे. गुरुवारी (१० जून) या दौऱ्यासाठी १९ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. आता मराठमोळ्या गायकवाडने आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंका दौऱ्याची सुरुवात १३ जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.
इतर युवा शिलेदारांप्रमाणे ऋतुराजही श्रीलंका दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणार आहे. आपल्याला मिळालेल्या या संधीमुळे तो अतिआनंदित आहे. याबरोबरच कारकिर्दीतील पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी सज्जदेखील झाला आहे.
भारतीय संघातील निवडीनंतर २४ वर्षीय गायकवाड म्हणाला की, “मी खूप आनंदी आहे. ज्याक्षणी मला माझ्या निवडीची बातमी मिळाली, त्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पूर्ण क्रिकेट प्रवासाची दृश्ये उभी राहिली होती. मी कुठून माझ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात केली होती आणि आज मी कुठे पोहोचलो आहे. मी सध्या खूप भावनिक अवस्थेत आहे. अशावेळी आपली कारकिर्द घडवणाऱ्या लोकांची आठवण येते, मग माझे आई-वडिल, मित्रमंडळी वा प्रशिक्षक या सर्वांचे विचार माझ्या डोक्यात आले. या सर्वांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
चेन्नई संघाकडून डावाची सुरुवात करताना तब्बल ५ अर्धशतके करणाऱ्या गायकवाडला स्वत:मधील क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला सामावून घेऊ शकतो, हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे त्याने सांगितले आहे.
गायकवाड म्हणाला की, “संघाच्या आवश्यकतेनुसार फलंदाजी करणे हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. मग ती आक्रमक फटकेबाजी असो वा सांभाळून संथ आणि संयमी फलंदाजी करणे. एका फलंदाजाला बऱ्याचदा आपल्याला संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी झुंज द्यावी लागते. मी आक्रमक आणि बचावात्मक दोन्हीही स्थितीसाठी अनुकूल आहे. मला वाटते की, हीच माझी खरी ताकद आहे.”
ऋतुराज गायकवाडची दमदार देशांतर्गत क्रिकेट कारकिर्द
वर्ष २०१६ पासून गायकवाड महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने २०१६ ला वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राकडून रणजीमध्ये पदार्पण केले होते. गायकवाड महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत.
तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४७.८७च्या सरासरीने ५९ सामन्यात २६८१ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ४६ टी२० सामन्यात १३३७ धावा केल्या आहेत. तसेच तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. गायकवाड २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बी व दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्ल्यू संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने भारतीय अ संघाकडून पदार्पणाचा सामना इंग्लंड लायन्सविरुद्ध (इंग्लंड अ) खेळला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी अष्टपैलूला आयपीएलची ऑफर देण्यासाठी केकेआरचा संघमालक शाहरुखने गाठलं होतं लंडन
ओळखा पाहू! आज क्रिकेटविश्वाला वेड लावणारे स्टार भारतीय क्रिकेटपटू, बालपणी दिसत होते ‘असे’
‘आजारी वडिलांना घेऊन खूप भटकलो, परंतु डॉक्टरांनी दार उघडले नाही,’ कोहलीने सांगितली दु:खद आठवण