भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड ए संघ सध्या इंडिया ए संघाविरुद्ध बेंगलोर येथे तीन प्रथमश्रेणी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्याला गुरुवारी (15 सप्टेंबर) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी शानदार खेळ दाखवला. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर इंडिया ए संघाने पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत सर्वबाद 293 धावा केल्या होत्या.
मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर या अखेरच्या सामन्यात इंडिया ए संघाचा कर्णधार प्रियंक पांचाल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 54 चेंडूवर 5 धावांची संथ खेळी करत तो बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने अभिमन्यू ईस्वरन याच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. ईस्वरन 38 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर ऋतुराजने डाव पूर्णपणे आपल्या हाती घेतला. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. चांगल्या फॉर्मात असलेला रजत पाटीदार 30 धावा करत बाद झाला. सर्फराज खान याला यादरम्यान खातेही खोलता आले नाही.
ऋतुराजने आपला डाव पुढे नेत प्रथमश्रेणी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 127 चेंडूवर 12 चौकार व 2 षटकार खेचून 108 धावा केल्या. त्याने पाचव्या गड्यासाठी उपेंद्र यादवसह 134 धावांची भागीदारी केली. ऋतुराज भारताचा बाद होणारा पाचवा फलंदाज ठरला.
ऋतुराज बाद झाल्यानंतर उपेंद्रने 76 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी न करता आल्याने इंडिया ए चा डाव 293 धावांवर संपला. भारताचा अखेरचा गडी बाद झाल्यानंतर खेळ संपवण्यात आला. न्यूझीलंडसाठी मॅथ्यू फिशर याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश
‘या’ कारणांमुळे हुकली रसेल-नरीनची वर्ल्डकप वारी; निवडकर्ते म्हणतायेत, “आता ते…”
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित