मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (९ एप्रिल) १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाला. त्यामुळे तो भारतात खेळताना अपयशी ठरताना दिसत आहे.
ऋतुराज भारतात फेल, तर युएईत हिट
हैदराबादविरुद्ध ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) १३ चेंडूत १६ धावा केल्या. त्याला वेगवान गोलंदाज टी नटराजनने त्रिफळाचीत केले. दरम्यान, तो सलग चौथ्या आयपीएल सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसले आहे. त्याचमुळे तो भारतीय खेळपट्टीवर आयपीएलमध्ये अडखळत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. ऋतुराजने आयपीएलमध्ये भारतात १२ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १९.४५ च्या सरासरीने आणि १२०.९० च्या स्ट्राईक रेटने केवळ २१४ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.
याउलट ऋतुराज जेव्हाही आयपीएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळला आहे, तेव्हा त्याची बॅट तळपली आहे. विशेष म्हणजे ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) युएईमध्येच २०२० साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी कोरोना संकटामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर २०२१ आयपीएल हंगामातील दुसरा टप्पा देखील युएईमध्ये खेळण्यात आला. त्यामुळे ऋतुराजने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण २७ सामन्यांतील १५ सामने युएईच्या धरतीवर खेळले.
महत्त्वाचे म्हणजे ऋतुराजची बॅट युएईमध्ये तळपतानाही दिसली. त्याने युएईत आयपीएल खेळताना १५ सामन्यांतील १५ डावांत ५८.४५ च्या सरीसरीने ६४३ धावा ठोकल्या. यावेळी त्याचे स्ट्राईट रेट १३३.१२ इतका होता. त्याचबरोबर त्याने युएईमध्ये ५ अर्धशतके आणि १ शतक केले आहे.
ऋतुराज करतोय संघर्ष
ऋतुराजने २०२१ हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. मात्र, आयपीएलच्या २०२२ (IPL 2022) मधील हंगामात तो सुरुवातीच्या ४ सामन्यांत मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याने हैदराबादविरुद्ध पहिल्यांदाच या हंगामात दोन आकडी धावसंख्या पार केली. आत्तापर्यंत चार सामन्यात त्याने अनुक्रमे ०, १, १ आणि १६ धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या ऋतुराजच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. पण आता चेन्नई सुपर किंग्स संघाला त्याच्याकडून पुढे चांगल्या खेळाची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सहनही होईना अन् सांगताही येईना! सामन्यादरम्यान गुजरातच्या खेळाडूला जोराची लागली, मग काय झालं पाहाच
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य