रविवारी (१९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला युएईमध्ये सुरुवात झाली. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे हा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित झाला होता. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने युएईमध्ये दुसऱ्या टप्प्यात आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. या विजयात ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले.
गायकवाडचा मोठा विक्रम
ऋतुराजने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून सलामीला फलंदाजीला येत ५८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली. हे ऋतुराजचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक आहे. त्याने त्याच्या आयपीेल कारकिर्दीतील १४ व्या डावात खेळताना हे अर्धशतक केले आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात सहा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने मॅथ्यू हेडनची बरोबरी केली आहे. हेडनने देखील आयपीएलमध्ये सहाव्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्यासाठी १४ डाव खेळले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर शॉन मार्श आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर लेंडल सिमन्स आहे. मार्शने १० डावात आणि सिमन्सने १२ डावात आयपीएलमध्ये सहाव्यांदा ५० धावांचा टप्पा ओलांडला होता.
याशिवाय रविवारी केलेली ८८ धावांची खेळी ही ऋतुराजचे युएईमधील सलग चौेथी अर्धशतकी खेळी ठरली. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी युएईमध्ये कोणालाही सलग ४ वेळा आयपीएलमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करता आली नव्हती.
गेल्यावर्षी आयपीएल २०२० हंगाम कोरोना व्हायरसच्याच धोक्यामुळे युएईत खेळवण्यात आला होता. त्या हंगामात चेन्नईच्या अखेरच्या तीन सामन्यात ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे रविवारचे त्याचे युएईतील सलग चौथे अर्धशतक ठरले.
त्याने गेल्यावर्षी युएईत अखेरच्या तीन सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद ६५ धावा, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ७२ धावा आणि पंजाब किंग्सविरुद्ध नाबाद ६२ धावा केल्या होत्या.
एवढेच नाही तर, ऋतुराज मुंबईविरुद्ध चेन्नईकडून सर्वोच्च धावांची खेळी करणाराही फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम मायकल हसीच्या नावावर होता. त्याने २०१३ साली मुंबईविरुद्ध ८६ धावांची खेळी केली होती.
चेन्नईचा विजय
रविवारी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. संघाने २४ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या होत्या. पण, सलमीवीर ऋतुराज गायकवाडने रविंद्र जडेजाला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. जडेजा २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ड्वेन ब्रावोने ८ चेंडूत २३ धावांनी तुफानी खेळी केली. तर ऋतुराज ८८ धावांवर नाबाद राहिला.
त्यामुळे चेन्नईने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या आणि मुंबईला १५७ धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून ऍडम मिल्ने, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
यानंतर १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला २० षटकांत ८ बाद १३६ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक ५० धावांची नाबाद खेळी केली अन्य कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध ऋतु’राज’! नाबाद ८८ धावा करत ‘या’ विक्रमाच्या यादीत गायकवाडने पटकावले अव्वल स्थान
मुंबईविरुद्ध सामना जिंकला, पण चेन्नईला मोठा धक्का, रायडू फलंदाजी करताना झाला जखमी, पाहा व्हिडिओ