महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने शनिवारी (24 जून) समाप्त झाले. या साखळी सामन्यानंतर प्ले ऑफसाठीचे समीकरण स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या धर्तीवर प्ले ऑफ सामने होणार असून, अंतिम सामना 29 जून रोजी पार पडेल. सध्या महाराष्ट्र क्रिकेट मधील सर्वात मोठे नाव असलेला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील पुणेरी बाप्पा संघाने चौथ्या क्रमांकावर साखळी फेरी समाप्त करत एलिमिनेटरमध्ये स्थान बनवले. त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत प्रवास करून विजेतेपद पटकावण्याचे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
एमपीएल स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर पुण्यातील अनेक उद्योजकांनी मिळून सर्वात मोठी बोली लावत पुणे फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली. खेळाडूंच्या लिलावात सर्वाधिक 27 खेळाडूंना खरेदी करत पुणेरी बाप्पाने एक मजबूत संघ उभा करण्याचा प्रयत्न केला. ऋतुराज गायकवाड याच्या रूपाने आंतरराष्ट्रीय व आयपीएल स्पर्धेचा अनुभव असलेला आयकॉन खेळाडू त्यांना मिळाला. तर, लिलावात यश क्षीरसागर, पवन शहा, सचिन भोसले व रोहन दामले यांच्यासारखे अनुभव असलेले महाराष्ट्र क्रिकेटमधील उमदे खेळाडू त्यांनी संघात सामील करून घेतली.
पुणे संघाने स्पर्धेतील आपला पहिला सामन्यात कोल्हापूर टस्कर्सवर शानदार विजय मिळवला. त्यानंतर छत्रपती संभाजी किंग्सवर देखील त्यांनी मात केली. दमदार सुरुवात केल्यानंतर मात्र त्यांना लागोपाठ तीन पराभवाचे धक्के बसले. पहिल्या दोन सामन्यातील मोठ्या विजयामुळे त्यांचा नेट रनरेट चांगला राहिला व ते एलिमिनेटरमध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरले.
पुणेरी बाप्पा संघाला एलिमीनेटर सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा क्वालिफायर 2 सामना खेळावा लागेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध त्यांना हा सामना खेळावा लागणार आहे. हा सामना जिंकल्यानंतरच ते अंतिम फेरीत प्रवेश करू शकतील.
एकप्रकारे आता विजयाची हॅट्रिक करून ऋतुराज आणि संघ एमपीएलची पहिली ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर असेल.
(Ruturaj Gaikwad Lead Puneri Bappa Need Three Wins For Clinch MPL 2023 Title)
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! एक भारतात तर दुसरी चीनमध्ये
“हार्दिकला लगेच वनडे संघाचा कर्णधार करा”, शास्त्रींनी केली बीसीसीआयकडे मागणी