2025 मध्ये भारतीय संघासमोर पहिलं आव्हान असेल ते इंग्लंडचं. भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दोन देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. त्यानंतर लगेचच चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे. टीम इंडियाचे लक्ष सध्या टी20 मालिकेवर आहे. त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार, निवड समिती 11 जानेवारी रोजी संघाच्या निवडीबाबत बैठक बोलावणार आहे.
या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या बहुतेक खेळाडूंना समाविष्ट केलं जाऊ शकतं. तसेच नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. या मालिकेसाठी अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकदिवसीय संघाची तयारी करण्यासाठीही हीच रणनीती अवलंबता येईल.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, रियान पराग खांद्याच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर टीम इंडियामध्ये परतणार आहे. गेल्या तीन टी20 मालिकांमध्ये कामगिरीत सातत्य दाखवू न शकलेल्या अभिषेक शर्माच्या जागी त्याला संघात स्थान मिळू शकतं. अष्टपैलू विभागात रमणदीप सिंगच्या जागी शिवम दुबेला घेतलं जाऊ शकतं. फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचं स्थान निश्चित आहे.
टी20 संघात संजू सॅमसनचा सलामीचा जोडीदार म्हणून इशान किशनचं नाव पुढे आलं आहे. तर रिषभ पंतला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनाही संघात स्थान मिळू शकतं. गोलंदाजीत, अर्शदीप सिंग, यश दयाल आणि आवेश खान संघात असतील. तर हर्षित राणा विजय कुमार वैशाखची जागा घेऊ शकतो. मयंक यादवची निवड त्याच्या पाठीची दुखापत किती प्रमाणात बरी झाली आहे यावर अवलंबून असेल.
हेही वाचा –
“गौतम गंभीरने नाही तर मी सुनील नारायणला आणले”, केकेआरच्या माजी फलंदाजाचा मोठा दावा
हिंदी भाषेवरील वक्तव्यावरून आर अश्विन वादात, सोशल मीडियावर चौफेर टीका
“विराट कोहलीने युवराज सिंगचं करिअर संपवलं!”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप