धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) सुरू आहे. मात्र, ही मालिका सुरू होण्याच्या आधीपासूनच भारतीय संघ खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करत आहे. या मालिकेपूर्वीच दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते या मालिकेचा भाग नाहीत. आता यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचाही समावेश झाला आहे. ऋतुराज देखील दुखापतीमुळे श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील लखनऊ येथे झालेला पहिला सामना भारताने जिंकला होता. या सामन्यात देखील ऋतुराजला मनगटाच्या दुखापतीमुळे संधी मिळाली नव्हती. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला ही मालिका सुरू होण्यापूर्वी दुखापत झाली. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार या दुखापतीतून ऋतुराज सावरलेला नसून तो श्रीलंकेविरुद्ध उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी संघात मयंक अगरवालचा (Mayank Agarwal) समावेश करण्यात आला आहे (Ruturaj Gaikwad ruled out of T20 series against Sri Lanka).
मयंक अगरवाल श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चंदीगढ़मध्ये तयारी करत होता. पण आता त्याला धरमशाला येथे पाठवण्यात आले आहे. यादरम्यान त्याचे बायो बबलमधून ट्रान्सफर करण्यात आले आहे, अशीही माहिती मिळाली आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा आणि तिसरा टी२० सामना धरमशाला येथे अनुक्रमे २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
ऋतुराज संघात स्थान मिळवूनही सातत्याने बेंचवर
खरंतर श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी२० सामन्यांची मालिका भारताने खेळली होती. या दोन्ही मालिकांसाठी ऋतुराजचा भारतीय संघात समावेश होता. मात्र, वनडे मालिकेपूर्वी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तो त्या मालिकेतील एकाही सामन्यात खेळू शकला नाही. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली नाही. त्यानंतर त्याने तिसऱ्या टी२० सामन्यातून पुनरागमन केले. मात्र, त्याला केवळ ४ धावाच करता आल्या.
पण, यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळेल, याची दाट शक्यता होती. मात्र, त्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला. आता ऋतुराज आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसू शकतो. त्याला या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने संघात कायम केले आहे. हा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकट्याच्या जीवावर इंग्लंड नडणारा परंतू आता विस्मृतीत गेलेला वेणुगोपाल राव
अर्रर्र झाला ना घोळ! युझवेंद्र चहलला शुभेच्छा देताना राजस्थान रॉयल्सने केली ‘ही’ मोठी चूक
जमशेदपूरचा विजयी चौकार; नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटती मात