भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने श्रीशांतला ७ वर्षे बंदीची शिक्षा भोगावी लागली होती. ह्या शिक्षेचा कालावधी सप्टेंबर महिन्यात समाप्त झाल्याने तो आता क्रिकेट खेळू शकतो.
‘केरळ अध्यक्षीय टी-२० स्पर्धेतून’ श्रीशांत स्पर्धात्मक क्रिकेटमधे पुनरागमन करत आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये आयपीएलच्या सामन्यांत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतांना श्रीशांतवर अंकित चव्हाण आणि अजित चंडिला ह्या सहकार्यांच्या साथीने स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप झाला होता. बीसीसीआयने केलेल्या चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली होती. मात्र श्रीशांतने ह्या विरोधात अपील केल्यानंतर त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी करून ७ वर्षे करण्यात आला.
या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा कालावधी पूर्ण झाल्याने केरळ क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित टी-२० स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानावर स्वतःला अजमावण्यासाठी श्रीशांत सिद्ध झाला आहे.
“स्पर्धात्मक क्रिकेटसाठी मी तंदुरुस्त” – श्रीशांत
३७ वर्षीय श्रीशांत पुनरागमनाबद्दल बोलतांना म्हणाला, “पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा तसेच केरळ क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या निवडकर्त्यांचा आभारी आहे. ७ वर्षांनंतर ही संधी मिळत असल्याने मी या संधीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करेन.”
मॅच फिटनेसबाबत विचारले असता श्रीशांत म्हणाला, “मी गेले काही दिवस सरावात कठोर मेहनत घेत आहे. माझ्या तंदुरुस्तीबद्दल मला पुरेसा आत्मविश्वास आहे. किंबहुना मी २०११ च्या विश्वचषकापेक्षा ह्यावेळी अधिक तंदुरुस्त असल्याचे माझे मत आहे.”
केरळ क्रिकेट असोसिएशनद्वारे स्पर्धेचे आयोजन
राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमुळे केरळमधील स्पर्धात्मक क्रिकेटचे पुनरागमन राज्य क्रिकेट असोसिएशनद्वारा आयोजित ‘केरळ अध्यक्षीय टी-२०’ स्पर्धेद्वारे होणार आहे. ६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळविण्यात येतील. १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील संघांची आणि खेळाडूंची निवड केरळ क्रिकेट असोसिएशननेच स्थापन केलेल्या समितीद्वारे करण्यात आली.
जैव सुरक्षित वातावरणात आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा करोनाच्या संकटापासून दूर ठेवत यशस्वी करण्याचं आव्हान केरळ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
बेयरस्टोचे तुफानी अर्धशतक; इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात दणदणीत विजय
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके