वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत वेस्टइंडीज संघावर एक डाव आणि ६३ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकन संघाने या मालिकेत १-० ने आघाडी देखील घेतली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लुंगी एन्गिडी आणि कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांसमोर, वेस्टइंडिज संघातील फलंदाजांचा काही निभाव लागला नाही. वेस्ट इंडीज संघाला पहिल्या डावात अवघ्या ९७ धावा करण्यात यश आले होते. पहिल्या डावात गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन संघाकडून क्विंटन डी कॉकने १४१ धावांची झुंजार खेळी केली होती. तर ऐडेन मार्क्रामने ६० धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाला सर्वबाद ३२२ धावा करण्यात यश आले होते.
तसेच दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघातील फलंदाजांना काही सुर गवसला नाही. या डावात त्यांना अवघ्या १६२ धावा करण्यात यश आले होते. हा सामना दक्षिण आफ्रिकन संघाने १ डाव आणि ६३ धावांनी आपल्या नावावर केला. या डावात कगीसो रबाडाने वेस्ट इंडिज संघाचे ५ फलंदाज माघारी धाडले होते.
हा सामना झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघाचा नवनिर्वाचित कर्णधार डीन एल्गर म्हणाला की, “हा संघाकडून एकत्रित प्रयत्न होता. बरेच नियोजन केले गेले आहे आणि आमच्या वतीने एक मोठा प्रयत्न केला गेला आहे. मी खेळाडूंना मोठे शतक करण्यास आणि ५ गडी बाद करण्यास सांगितले होते आणि मला या सामन्यात असे तीन उदाहरण पाहायला मिळाले. आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि फलंदाजांना ३०० धावांचा आकडा पार करताना पाहून बरे वाटले. कारण आम्ही गेल्या काही सामण्यांपासून धावा करण्यास संघर्ष करत आहोत. ”
तसेच वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट म्हणाला, “ते दर्जेदार गोलंदाज आहेत. परंतु आम्ही त्या प्रकारची फलंदाजी केलीच नाही, ज्याप्रकारची फलंदाजी आम्ही करू शकलो असतो. दुसऱ्या कसोटी सामन्यात आम्हाला आणखी चांगली फलंदाजी करायची आहे. मला वाटते की,आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. जेडन सिल्स एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ”
महत्त्वाच्या बातम्या –
‘फॅब फोर’ पैकी केवळ ‘कर्णधार’ विराट कोहलीच ‘या’बाबतीत अजिंक्य
फ्रेंच ओपन: जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद; ‘हे’ विक्रमही केले नावावर