भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. या संघात सहभागी असलेला युवा अष्टपैलू दीपक हुड्डा हा आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे मन जिंकतोय. त्याच्या याच कामगिरीचे आता भारताच्या माजी यष्टीरक्षकाने कौतुक केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना भारताचा माजी यष्टीरक्षक व समालोचक सबा करीम यांनी दीपक हुड्डाचे विशेष कौतुक केले. त्यांच्यामते दीपक हा सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. करीम म्हणाले,
“मला वाटते की दीपक हा सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारतात सर्वात मोठा मॅचविनर आहे. तो संघासाठी एक दुवा सिद्ध होऊ शकतो. अष्टपैलू म्हणून तो संघासाठी चांगले योगदान देईल. जो आत्मविश्वास त्याने आयपीएलमध्ये दाखवला होता, तोच आत्मविश्वास तो भारतीय संघासाठी दाखवतोय.”
हुड्डा यांच्यासाठी २०२२ हे वर्ष खूप चांगले गेले. त्याला भारताकडून वनडे आणि टी२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. हुडाने आयर्लंडविरुद्ध आपल्या केवळ तिसऱ्याच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावलेले. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात आक्रमक खेळ त्याने दाखवलेला. यानंतर दुसऱ्या टी२०मध्ये त्याच्या जागी विराट कोहलीचा संघात समावेश झाल्यानंतर संघाच्या संघनिवडीवर टीका झालेली.
दरम्यान, हुडाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ दाखवला होता. राजस्थानकडून खेळताना त्याने कर्नाटकविरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला. त्यानंतर आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने त्याला मोठी बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले होते. उत्कृष्ट कामगिरी करत त्याने संघाला प्ले ऑफपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान
बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये