भारतीय संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. साखळी फेरीतील विजयी प्रदर्शनानंतर सुपर-4 फेरीत भारतीय संघाची गाडी रुळावरून खाली घसरली आणि त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली. यानंतर आता भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 साठी कसून तयारीला लागेल. तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारतीय संघ (Team India) साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. यानंतर रवी शास्त्री यांच्याजागी मुख्य प्रशिक्षकपदी द्रविड यांची नियुक्ती केली गेली होती. परंतु द्रविड (Rahul Dravid) यांना प्रशिक्षक म्हणून अजूनही खास छाप सोडता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी आणि वनडे दोन्हीही मालिकेत पराभव पाहिला होता. त्यानंतर इंग्लंडमध्येही भारतीय संघाने महत्त्वपूर्ण असा कसोटी सामना गमावला. यानंतर चांगल्या सुरुवातीनंतरही आशिया चषकात भारतीय संघ अपयशी ठरला आहे.
अशात द्रविड यांच्यासाठी आगामी टी20 विश्वचषक खूप महत्त्वपूर्ण ठरेल. बीसीसीआयचे माजी निवडकर्ता सबा करीम (Saba Karim) यांचे म्हणणे आहे की, द्रविड यांच्यासाठी ही वेळ खूप महत्त्वाची असेल.
करीम म्हणाले की, “ठीक आहे. इथपर्यंत द्रविडलाही माहिती आहे की, त्याचा ‘हनीमून पीरियड‘ संपला आहे. तो संघाच्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कत आहे. परंतु अद्याप त्यात तो यशस्वी ठरलेला नाही. प्रत्येकाला द्रविडकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे द्रविडसाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. टी20 विश्वचषकानंतर वनडे विश्वचषक येतोय. जर भारतीय संघ या दोन्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकला, तर द्रविड मनातल्या मनात संतुष्ट होईल.”
दरम्यान टी20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेबंरदरम्यान टी20 विश्वचषकाचे सामने होतील. भारतीय संघ त्यांचा दुसरा टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून
‘दुखापतीनंतर पुनरागमन सोपे नव्हते’, कर्णधार राहुलने सांगितली ‘कमबॅक’ची कहाणी