2003-2011 या काळात तेंडूलकर-सेहवाग जोडीने जगातिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक वेगळाच दबदबा निर्माण केला होता. तब्बल पाऊण दशक या दोघांनी जागतिक गोलंदाजीवर अधिराज्य केलं.
सेहवागची भारतीय संघात जेंव्हा एन्ट्री झाली तेव्हा सचिन हे जागतिक क्रिकेटमधील प्रस्थापित नाव झालं होतं. पुढं याच नवख्या सेहवागला हाताशी घेऊन सचिनने जागातील उत्तमोत्तम गोलंदाजांना झोडपून काढलं.
सचिन-सेहवाग या सलामी जोडीने भारताला अनेक वेळा स्फोटक सुरूवात करून दिली, तर कित्येकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मग तो 2003 च्या विश्वचषकातील पाकिस्तानच्या वसिम-वकार-शोएबचा यांचा तोफखाना असो की 2011 विश्वचषकातील अफ्रिकेची स्टेन गन असो. कायमच सचिन-सेहवागच्या स्फोटक फलंदाजीने अनेक गोलंदाजांना गुढगे टेकायला लावले आहेत.
काल कॉमेडियन तसेच स्पोर्ट्स अॅंकर विक्रम साठ्ये यांच्या ” व्हाट द डक 3″ या पाँडकास्टच्या नविन भागात सचिनने त्याच्या व सेहवागच्या आठवणींना ऊजाळा दिला.
यामध्ये सचिन म्हणाला, “विरु टिम इंडियात जेव्हा नविन होता तेव्हा खूपच लाजरा व मितभाषी होता. तो खूपच कमी बोलायचा. मला मात्र विरुची चिंता होती कारण मला त्याच्याशी डावाची सुरूवात करावी लागायची. त्यांच्याशी संवाद झाला तरच आमच्यात ताळमेळ बसणार होता नाहीतर दोघांनाही एकत्र फलंदाजी करणं अवघड गेलं असतं.
त्यासाठीच मी एकदा त्याला जेवायला घेऊन गेलो तर तिथे मला समजलं की वजन वाढेल म्हणुन विरु चिकन खात नाही. त्यावेळी मी खूप हसलो होतो. तसेच कित्येकदा बॅटिंगला जाताना माझ्याकडे प्लॅन असायचे तर विरुकडे गाणी.”
आपणही कित्येकदा सेहवागला मैदानावर गाणी म्हणताना आणि बिंधास्तपणे वागताना पाहीले अाहे.
सचिन-सेहवाग जोडीने भारतासाठी डावाची सुरूवात करताना 93 एकदिवसीय सामन्यात 42.13 च्या सरासरीने 3919 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी 12 शतकीय तर 18 अर्धशतकी भागिदाऱ्या रचल्या आहेत.
सचिन-सेहवाग ही एकदिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथी सर्वोत्तम जोडी आहे. तर पहिल्या स्थानावर 136 सामन्यात 6609 धावांसह सचिन-गांगुली ही जोडी आहे.
यामधे महत्वाची बाब अशी की सौरभ गांगुलीने सेहवागसाठी आपल्या सलामीच्या स्थानाचा त्याग केला होता.