सचिनने १८८९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याला अजून लोक वंडर बॉय समजत होते पण आता साल होते १९९२ त्याने खूप मेहनतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आपण तयार आहोत हे जगाला दाखवून दिले होते. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की आपण जो खेळ खेळतो त्या खेळातील सर्वोच चषक व पदक आपल्या हातात असावा. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्या सयुंक्तविद्यमाने त्यांच्या धर्तीवर विश्वचषक होणार होता. भारतीय संघाची घोषणा झाली, भारतीय संघात सचिनला निवडले गेले होते. सचिननेही बोलून दाखवले होते की, “१९८३चा विश्वचषक जिंकल्यावर त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि विश्वचषक जिंकणे त्याचे स्वप्न आहे.”
विश्वचषकामध्ये भारताचा पहिला सामना इंग्लंड सोबत झाला. सचिनचा तो पहिलाच विश्वचषकचा सामना होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजी केली ज्यात त्यांनी २३६ धावा केल्या. प्रतिउत्तरात भारतीय संघाचा डाव २२७ धावातच आटोपला. विश्वचषकामधील पहिलाच सामना खेळणाऱ्या सचिनने ३५ धावा केल्या. स्वप्नपूर्तीकडे हे सचिनचे पहिले पाऊल होते. भारताने सामना ९ धावांनी गमावला होता.
भारताचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार होता पण सामन्यापूर्वीच पावसाने त्याचा डाव साधला, काही वेळाने पाऊस थांबला. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मैदान कोरडे करण्याचे कसब चालू झाले. काहीवेळेनंतर मैदान पाहून पंचानी सामना होणार असे घोषित केले पण सामना ३० षटकांचा होणार असल्याचे सांगितले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी गेले असता जेमतेम २-३ चेंडू झाले असता वरूण राजाला पुन्हा लहर आली आणि पूर्ण सामना पावसाने धुवून गेला. सचिनला यात फलंदाचीची संधीच मिळाली नाही.
भारतीय संघाचा तिसरा सामना होता तो त्यावेळेसच्या विश्वचषक विजेत्या संघाशी म्हणजे ऑस्टेलियाशी. मायदेशात सामने होणार म्हणून तो पसंतीचा संघ होते. कांगारूंनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डीन जोन्सच्या दमदार ९० धावांच्या जोरावर त्यांनी भारत समोर विजयासाठी २३७ धावांचे लक्ष ठेवले होते. सामना फार नजीकचा होणार होता कारण भारतीय संघाला चांगलीच विश्रांती मिळाली होती. भारतीयांनी धावांचा पाठलाग सुरु केला पण १६व्या षटकातील २ चेंडू टाकले असताना पाऊस सुरु झाला, काही वेळाने तो थांबला. भारताला आता सुधारितलक्ष दिले गेले होते ४७ षटकात २३६ धावा. ठराविक कालावधीनंतर आपले फलंदाज बाद होत राहिले, अझरुद्दीन ९३ धावांवर धावबाद झाला आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकू लागला. सचिन या सामन्यात काही खास करू शकला नाही, त्याने ११ धावांची खेळी केली. सामन्यात रंगत ही शेवटच्या षटकात आली. भारतीय संघाला जिंकण्यासाठी ६ चेंडूत १३ धावांची गरज होती. फलंदाजीला होते किरण मोरे तर शेवटचे षटक घेऊन वेगवान गोलंदाज टॉम मूडी आला आणि पहिल्या दोन्ही चेंडूंवर मोरेंनी चौकार खेचले. आता भारतीय संघाला ४ चेंडूत ५ धावांची गरज होती. पण तिसऱ्या चेंडूवर किरण मोरे त्रिफळाचित झाले. सामना भारतीय संघाच्या हातून निसटला आणि शेवटी भारताने सामना १ धावेने गमवला.
भारतीय संघाचा पुढचा सामना होता पाकिस्तानशी. भारतीय संघाला विजय आवश्यक होता. पाकिस्तानी संघ चांगल्या लयीत तर होताच पण पाकिस्तानी गोलंदाज आग ओकत होते. इम्रान खान, वकार युनस, वसीम अक्रम हे सगळे तुफान लयीत गोलंदाजी करायला लागले होते. तेथील परिस्थती गोलंदाजीसाठी खूप पोषक होती. भारताने नाणेफेक जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिनने नाबाद राहत ५४ धावांची उपयुक्त खेळी केली आणि धावसंख्या २३७ वर पोहोचवली. एरवी ताबडतोड फलंदाजी करणाऱ्या सचिनने संयमाने फलंदाजी करत धावफलकाला आकार दिला. त्याने ५४ धावांसाठी ६२ चेंडू घेतले त्याने यात फक्त ३ चौकार लगावले. पाकिस्तानची गोलंदाजी जशी मजबूत होती तशी फलंदाजी नव्हती, त्यांची फलंदाजी म्हणजे ‘चले तो चांद तक नही तो शाम तक’ अशीच होती. त्यांनी फक्त १७० धावा केल्या, भारताने सामना हा ४३ धावांनी जिंकला. सचिनने गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि दहा षटकांमध्ये मध्ये ३७ धावा देत १ विकेट मिळवली आणि याचे फलित म्हणून सचिनला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित केले गेले. हा सचिनचा पहिला मन ऑफ दी मॅच पुरस्कार होता.
भारताचा पुढचा सामना झिम्बाबवे सोबत होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना हा फक्त ३० षटकांचा होणार होता. भारताने सचिनच्या ताबडतोड ७७ चेंडूंत ८१ धावांच्या मोबदल्यात २०३ धावांचे लक्ष ठेवले. ३० षटकात ते गाठण्याच्या दडपणाखाली संघ तग धरू शकला नाही. त्यांचा डाव १०४ धावांवर आटोपला. सचिनने या सामन्यात देखील एक विकेट मिळवली. या सामन्याचा मानकरी सचिन ठरला.
भारताचा पुढचा सामना वेस्ट-इंडिजशी झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली पण या वेळेस सचिन ४ धावच करू शकला. भारतीय संघाने १९७ धावांचे लक्ष दिले आणि वेस्ट इंडिजने ५ विकेट हातात ठेऊन लीलया पार केले. भारताची विजयी मालिका येथे खंडित झाली.
भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकूनही भारताला फलंदाजीला बोलावले. सचिनच्या फलंदाजीचा तडाखा त्यांना बसला. सचिनने ८४ धावांची खेळी करत धावसंख्या २३० वर नेली. पण उत्तरात हे लक्ष्य ४ गाडी हातात असतानाच सध्या केले आणि सामना संपवला. भारत सामना हरला.
गटातील भारताचा शेवटचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार होता. पावसामुळे सामना ३० षटकचा झाला. नाणेफेक साऊथ आफ्रिकेने जिंकला पण भारताला फलंदाजीला बोलावले. भारताने या सामन्यात १८० धावा बनविल्या, सचिन मोठी खेळी नाही करू शकला त्याने १४ चेंडूत १४ धावा बनवल्या. प्रतिउत्तरात साऊथ आफ्रिकेने ५ चेंडू असताना हे लक्ष्य ४ फलंदाजांच्या मोबदल्यात मिळवले.
आठ सामन्यातील फक्त दोन विजय आणि एक अनिर्णयीत सामन्याचे गन मिळवून भारताच्या खात्यात फक्त ५ गुण जमा झाले. भारताला गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागले.
सचिनने जगाला दाखवून दिले की तो गुणी खेळाडू होताच पण आता तो भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा बनणार होता. सचिनने ८ सामन्यांपैकी ७ सामन्यात फलंदाजी करताना २८३ धावा काढल्या होत्या. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे सचिनने महान खेळाडू होणार असल्याचे विश्वचषकात दाखवले. सचिनचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही पण त्याने प्रयत्न केले. असे म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी असते. “सचिन पहिली पायरी तर चढला होता आता बाघायचे होते की यश कितव्या पायरीवर मिळते….
लेखक- राजकुमार ढगे
( टीम महा स्पोर्ट्स )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)