भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याची निवड रणजी संघात केली जाईल. श्रीसंतवर बीसीसीआयने २०१३ च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती.
परंतु, मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला होता. पण त्यावेळी त्याच्या निलंबनाचे ६ वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता १३ सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीच्या ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे.
श्रीसंतच्या (S Sreesanth) परत येण्याच्या शक्यतेवर केरळचा कर्णधार सचिन बेबी (Sachin Baby) म्हणाला की तो खूप खुश आहे. कारण श्रीसंत त्याच्यासाठी भावा सारखा आहे.
सचिन म्हणाला, “गेली सात वर्षे मी त्याची केरळकडून खेळण्यासाठी वाट पाहत आहे. आम्ही एकत्र काम, सराव आणि प्रवास करु. आमच्यात असलेले संबंध खूप चांगले आहेत. अगदी गेली दोन वर्षे जेव्हा तो खेळत नव्हता आणि मी कर्णधार होतो, तेव्हा मला बरेचदा तो सांगायचा की काय करायला पाहिजे.”
एका चॅट शोमध्ये सचिन म्हणाला, “श्रीसंत अनेकदा म्हणतो, की आपण इराणी ट्रॉफी खेळायला पाहिजे. जो रणजी ट्रॉफीचा विजेता संघ खेळतो. तो मला जे काही सांगतो ते मी माझ्या संघ सहकाऱ्यांपर्यंत पोचवतो.”
गेल्या वर्षी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये श्रीसंत इंडोर नेटमध्ये सचिनला गोलंदाजी करताना दिसला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सचिन म्हणाला, “अनुभवी गोलंदाज श्रीसंतकडे अजूनही क्षमता आहे. आम्ही सर्वजण त्याची वाट पाहत आहोत. लॉकडाऊननंतर मैदाने तयार असल्यास तो सामना खेळण्याचा विचार करत आहे, तर सामना खेळण्यासाठी तंदुरुस्ती खूप महत्वाची आहे. केरळमध्ये सध्या पाऊस चालू असल्यामुळे आम्ही जुलैमध्ये सामना खेळण्याची योजना करत आहे.”
सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेबाबत बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी श्रीसंत सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या संघाच्या शिबिराचा भाग असेल. केरळचा महत्त्वाचा गोलंदाज संदीप वॉरियर (Sandeep Warrier) पुढील हंगामात तामिळनाडूकडून खेळणार आहे. आणि त्यामुळे श्रीसंतला त्याच्या जागी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटलाही कोरोनाची झळ! या माजी कर्णधारालाही झाली कोरोनाची लागण
-विराटला प्रपोज करणाऱ्या या महिला क्रिकेटपटूला खेळायचंय आरसीबीकडून
-“मला पण रोहित शर्मासारखी फलंदाजी करायची आहे”