क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांबद्दल जेव्हाही चर्चा होते, तेव्हा व्हीव्हीयन रिचर्ड्स, ब्रायन लारा, सचिन तेंडूलकर ही नावे आपसूकच तोंडात येतात. सचिन तेंडूलकर याच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात मिळून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. तसेच सचिन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. परंतु इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने इंग्लंडचा फलंदाज जो रुट याला या दिग्गजांच्या यादीत जागा दिली आहे. इतकेच नव्हे तर, वॉनने जो रुट लवकरच सचिनलाही मागे टाकू शकतो, असा दावा केला आहे.
जो रुटची गणना सध्याच्या काळातील महान खेळाडूंमध्ये केली जाते, कारण त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो इंग्लंडकडून आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो. जो रुट इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.
सध्या इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी दिग्गज खेळाडू ॲलिस्टर कुकच्या नावावर आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत 12472 धावा केल्या होत्या आणि 33 शतके झळकावली होती. रुटने देखील आपल्या कारकिर्दीत 142 कसोटी सामन्यांमध्ये 11940 धावा केल्या आहेत. आता रुट कुकपेक्षा केवळ 532 धावांनी मागे आहे आणि लवकरच तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. यादरम्यान इंग्लंडचा माजी दिग्गज वॉनने रुटबाबत मोठा दावा केला आहे.
खरं तर, ‘द टेलिग्राफसाठी’च्या त्याच्या स्तंभात इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने लिहिले की, “जो रुट अल्पावधीतच इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. एवढेच नाही तर त्याच्यात इतकी क्षमता आहे की, तो या बाबतीत सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. रुट खूप वेगाने धावा करत आहे, पण त्याच्यात अहंकार नाही. तो फक्त त्याचे क्रिकेट हुशारीने खेळत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
करोडोंची संपत्ती, एकापेक्षा एक महागड्या गाड्या, ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा जगतोय असे आलिशान आयुष्य
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!