मुंबई । केरळ येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील सचिनच्या नावाने असलेल्या पॅव्हेलियनची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. यासोबतच सचिन तेंडूलकरच्या आठवणीतील काही वस्तू गायब झाल्या आहेत.
नोव्हेंबर 2013 साली तत्कालीन भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या हस्ते सचिन पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले होते. सचिनने या पॅव्हिलियनसाठी एक जर्सी, हस्ताक्षर केलेली बॅट आणि चेंडू भेट म्हणून दिली होती. या पॅव्हिलfयनमध्ये सचिन सर डॉन ब्रॅडमन आणि वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांच्यासोबतचे काही फोटो आहेत. सचिनचा बालपणीचा फोटो येथे पाहायला मिळतो. हे स्टेडियम ग्रेटर कोची विकास प्राधिकरणाच्या मालकीचे आहे.
केरळ क्रिकेट संघटनेने ग्रेटर कोची विकास प्राधिकरणात भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे नियोजन करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे. हे स्टेडियम इंडियन सुपर लीगमधील केरळ ब्लास्टर्स एफसी संघाचे घरचे मैदान आहे.
नेहरू स्टेडियमवर 2014 साली आयएसएल सुरू झाल्यानंतर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले नाही. 2014 साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना या मैदानावर झाला होता. स्टेडियममधील पॅव्हेलियनची खराब परिस्थिती पाहून बीसीसीआयचे सचिव जयेश जॉर्ज यांनी चिंता व्यक्त केली आहे.