सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाती इंडिया लिजेंड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पोहोचणारा इंडिया लिजेंड्स पहिलाच संघ ठरला. ऑस्ट्रेलिया लिंजेड्ससोबत उपांत्य सामन्यात इरफान पठानने शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर कर्णधार सचिन आणि इरफानचा मुलगा इमरान याच्याशी चर्चा करताना दिसला.
इंडिया लिजेड्सने या पहिल्या उपांत्य सामन्यात सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया लिजेंड्सने 5 विकेट्सच्या नुकसानावर 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतासाठी नमन ओझा याने 62 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकांमध्ये इरफान पठाण (Irfan Pathan) याने 12 चेंडूत 37 धावांची वादळी खेळी केली. चार चेंडू शिल्लक असताना भारताने हा सामना जिंकला.
सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) इरफानचा मुलगा इमरान सोबत आपुलकीने बोलत होता. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इरफानने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रामवरूनही हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसत आहे सचिन इमरानला विचारतो, “आपण आजचा सामना कशामुळे जिंकू शकतो?” यावर इमरान त्याचे वडील इरफानकडे बोट दाखवतो. यावर सचिन म्हणतो की, “त्याने एकापाठोपाठ षटकार मारल्यामुळे आपण जिंकलो.”
दरम्यान, इरफानने केलेल्या 37 धावांमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. त्याने गोलंदाजी करताना दोन विकेट्सही घेतल्या. कर्णधार सचिन तेंडुलकर या सामन्यात 11 चेंडू खेळून 10 धावा करू शकला. नमन ओझाला विजयानंतर सामनावीर निवडले गेले. शुक्रवारी श्रीलंका लिजेंड्स आणि वेस्ट इंडीज लिजेंड्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. यापैकी जो संघ जिंकले, तो अंतिम सामन्यात इंडिया लिजेंड्सशी भिडण्यासाठी सज्ज होईल. अतिम सामना शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी रायपूरमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –