भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारी चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करत इतिहास रचला होता. परंतु यावेळी परिस्थिती अधिक कठीण असणार आहे. कारण विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचे ऑस्ट्रेलिया कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे यंदा वॉर्नर, स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने हे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरतील, असे वक्तव्य करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संघाला इशारा दिला आहे.
सचिन म्हणाला की, “यापूर्वी दोन्ही संघात झालेल्या कसोटी मालिकेवेळी ऑस्ट्रेलियाचा संघ वेगळा होता. परंतु यावेळी त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खेळाडू उपलब्ध आहेत. ते खेळाडू म्हणजे, वॉर्नर, स्मिथ आणि लॅब्यूशाने होय. या खेळाडूंच्या आगमनामुळे ऑस्ट्रेलिया कसोटी संघ अधिक मजबूत झाला आहे. जेव्हा संघात अनुभवी खेळाडू उपलब्ध नसतात. तेव्हा त्यांची कमतरता भासते. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलिया कसोटी संघात ही गोष्ट प्रखरतेने जाणवली होती.”
पहिल्यांदाच भारतीय संघाने झळकावली होती विजयी पताका
यापूर्वी २०१८-१९ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरच ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत करण्याची ही भारताची पहिलीच वेळ होती. यासह विराट कोहली हा पराक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला होता. परंतु वॉर्नर आणि स्मिथ या कसोटी मालिकेचा भाग नव्हते. कारण मार्च २०१८मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर एका वर्षाची बंदी घातली होती.
असे आहे कसोटी मालिकेचे वेळापत्रक
यंदा दोन्ही संघामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेची सुरुवात दिवस-रात्र कसोटी सामन्याने होणार आहे. ऍडलेड येथे १७ डिसेंबरपासून हा सामना खेळला जाईल, तर २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना होईल. उर्वरित सामने ७ जानेवारी (तिसरा कसोटी सामना) आणि १५ जानेवारी (चौथा व अंतिम कसोटी सामना) पासून सुरु होतील. १९ जानेवारी रोजी कसोटी मालिका संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
दुःखद! ‘या’ महान क्रिकेटपटूला झाला पितृशोक, आजारपणामुळे वडिलांचे निधन