भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने १९ वर्षांचा आसताना इंग्लंडच्या काऊंटी क्लब यॉर्कशायरकडून खेळतानाच्या आठवणींना उजाळा दिला आहेे. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून २ फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोत तो आपला पासपोर्ट दाखवताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो इंग्लंडच्या स्टेडियममध्ये बसला असल्याचे दिसत आहे.
सचिनने हे २ फोटो शेअर करत लिहिले की, “हा फोटो माझ्या काऊंटी क्रिकेटच्या दिवसांची आठवण करून देतो. मी १९ वर्षांचा होतो, तेव्हा मी यॉर्कशायर (Yorkshire) क्रिकेट क्लबकडून खेळत होतो. माझ्यासाठी हा खूप खास क्षण होता. ज्याने मला योग्य दिशा दिली. याच काऊंटी क्रिकेटमुळे मला इंग्लंडची परिस्थिती समजण्याची संधीही मिळाली. खूप प्रेमळ आठवणी.” त्याने आपल्या कॅप्शनमध्ये फ्लॅशबॅक फ्रायडे या हॅशटॅगचा देखील वापर केला.
https://www.instagram.com/p/B_7LUSYFdPK/?utm_source=ig_web_copy_link
मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतकदेखील इंग्लंडविरुद्ध केले होते. त्याने ही शतकी खेळी आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी केली होती. अशाप्रकारे तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता.
तसेच तो यॉर्कशायरकडून खेळणारा पहिला परदेशी खेळाडू होता. त्याला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉटचा बदली खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले होते. मॅकडरमॉटला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. सचिनने २८ वर्षांपूर्वी म्हणजेच ७ मे १९९२ ला हँपशायर विरुद्ध खेळताना काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने यॉर्कशायरकडून पहिल्याच सामन्यात पहिल्या डावात ८६ धावांची खेळी केली होती.
CLASSIC ENCOUNTER: It is 28 years to the day since a certain @sachin_rt made his Yorkshire debut #OneRose
— Yorkshire CCC (@YorkshireCCC) May 7, 2020
२४ एप्रिल १९७३मध्ये जन्मलेला सचिनने मागील महिन्यात आपल्या वयाची ४७ वर्षे पूर्ण केली आहेत. कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) त्याने आपला वाढदिवस साजरा न करण्याचाही निर्णय घेतला होता.
सचिनने आतापर्यंत २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत.
तसेच त्याने केवळ १ टी२० सामना खेळताना केवळ १० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सचिनने ७८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३.८३ च्या सरासरीने २३३४ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत
-…तर होऊ शकते आयपीएल २०२० चे आयोजन
-विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरलेल्या या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केली खांद्याची सर्जरी
-क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षण