आजपासून भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश संघात होणाऱ्या तिरंगी टी २० मालिकेला सुरवात होणार आहे. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मालिका होणार आहे.
स्वातंत्र्याला सिंहली भाषेत निदाहास असे म्हटले जाते. त्यामुळे या मालिकेचे नाव निदाहास ट्रॉफी असे आहे. श्रीलंकेत होणारी ही मालिका जवळ जवळ २० वर्षांनी पुन्हा होत आहे. याआधी ही मालिका १९९८ साली श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंड संघात झाली होती. तसेच ही तिरंगी वनडे मालिका खेळवण्यात आली होती.
तसेच १९९८ साली झालेली ती निदाहास ट्रॉफी ही श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवली गेली होती.
त्याचबरोबर ही मालिका भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहण्याचे कारण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली या दोन सलामीवीरांमध्ये अंतिम सामन्यात झालेली ऐतिहासिक द्विशतकी भागीदारी.
१९९८ साली झालेल्या सिंगर अकाई निदाहास ट्रॉफीमध्ये ७ जुलै १९९८ ला भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत आमने सामने आले होते. या सामन्यात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला योग्य ठरवत सचिन आणि गांगुलीने २५२ धावांची सलामी भागीदारी रचली होती.
त्यावेळी सचिन आणि गांगुलीने रचलेली ही द्विशतकी भागीदारी सर्वोच्च सलामी भागीदारी होती. या सामन्यात सचिन आणि गांगुली या दोघांनीही शतके झळकावली होती.
सचिनने त्याच्या काकिर्दितील १७ वे वनडे शतक करताना १३१ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने १२८ धावा केल्या होत्या आणि गांगुलीने १३६ चेंडूत १०९ धावा केल्या होत्या यात त्याने २ षटकार आणि ६ चौकार मारले होते.
पण या सामन्यात हे दोघे बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन, सनाथ जयसूर्या, अरविंद डिसिल्वा, निरोशन बंदरातिल्लेके,प्रमोदया विक्रमसिंघे आणि उपल चंदना या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत भारताला ५० षटकात ६ बाद ३०७ धावांवर रोखले होते.
त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडूनही अरविंद डी सिल्वाने शतक करून चांगली लढत दिली होती. त्याने आक्रमक खेळ करत ९४ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या होत्या. परंतु त्याला बाकी फलंदाजांकडून भक्कम साथ मिळाली नाही.
भारताच्या गोलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स घेतल्याने श्रीलंकेला सर्वबाद ३०१ धावांवर रोखण्यात यश मिळवले. या सामन्यात अजित आगरकरने ५३ धावात ४ विकेट्स घेऊन महत्वाची कामगिरी बजावली होती. तसेच अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी ८ धावांची गरज होती तर भारताला जिंकण्यासाठी एका विकेटची गरज होती.
या अखेरच्या षटकात अनिल कुंबळेने विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला. भारताने या अटीतटीच्या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे यावर्षी या तिरंगी टी २० मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा १९९८ साली जेव्हा ही मालिका पहिल्यांदा खेळली होती तेव्हा फक्त १० वर्षांचा होता .






