बुधवार (21 जून) बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगणार आहे. दोन्ही संघ तब्बल पाच वर्षानंतर एकमेकांसमोर फुटबॉलच्या मैदानात येतील.
या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे. भारतीय संघ पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघाच्या आजवरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तानचा संघ 27 व्यांदा आमनेसामने येणार आहे. याआधी या दोघांमध्ये 26 सामने झाले असून, ज्यामध्ये भारताने 13 वेळा विजय मिळवला होता, तर पाकिस्तानला फक्त 3 वेळा विजय मिळवता आला आहे. दोघांमध्ये 10 सामने अनिर्णित राहिले.
भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या मागील चारही सामन्यात गोल नोंदवले आहेत. त्यामुळे संघाला पुन्हा एकदा त्याच्याकडून अपेक्षा असेल. तसेच, सहल व छांगते या युवा स्ट्रायकर्सकडून देखील भारतीय संघाला इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा असणार आहे.
(SAFF Football Championship India Face Pakistan At Bengaluru)