भारतीय संघाच्या जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यात चेतन सकारिया या वेगवान गोलंदाजाने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २३ वर्षाच्या सकारियाला आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. श्रीलंका दौऱ्यत त्याने दोन टी-२० आणि एक वनडे सामना खेळला आणि त्याने त्या सामन्यांत ३ विकेट मिळवल्या. त्याने आता या श्रीलंका दौऱ्यातील अनुभवाबद्दल सांगितले आहे.
त्याच्या अंतरराष्ट्रीय पदार्पणाबाबत बोलताना चेतन सकारिया म्हणाला, “जेव्हा मी पहिला चेंडू टाकण्याचा तयारी करत होतो तेव्हा रनअप घेण्याच्या आधी माझ्या समोर काही क्षण आले. त्या क्षणी माझ्या आयुष्यात झालेली प्रत्येक घटना फ्लॅशबॅकमध्ये चालू होती. चांगले, वाईट, त्याग, टीका हे सर्व. तो भावनिक क्षण होता. पण त्यातून मला चांगले प्रदर्शन करण्याची खुप प्रेरणा मिळाली”
चेतन सकारियाच्या वडीलांचे मे महिन्यात निधन झाले. तसेच त्यापूर्वी त्याने त्याच्या भावाला देखील गमावले होते. आयपीएलच्या लिलावामध्ये साकारियाला १.२० कोटीला राजस्थान राॅयल्स संघाने विकत घेतले होते. सकारियाने आयपीएलमध्ये संघासाठी ७ सामने खेळले असून त्यात त्याने ७ विकेट घेतले आहेत.
तो पुढे बोलताना म्हणाला, “भारतासाठी खेळणे स्वप्न खरे होण्यासारखे होते. जेव्हा मी पहिल्यांदा याबाबत ऐकले तेव्हा अनेक विचार माझ्या मनात चालू होते. मला विश्वास वाटत नव्हता, मी स्वत:ला चिमटा घेतला की, हे खरे आहे का? मी खेळण्याचा विचार केला नव्हता. माझ्यासाठी तर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये राहणेच खूप मोठी गोष्ट होती.”
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडशी पहिल्या चर्चेविषयी बोलताना सकारिया म्हटला, “मी स्तब्ध होतो आणि मला विश्वास बसत नव्हता की हे तेच आहेत, त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल, माझ्या अनुभवाविषयी आणि देशांतर्गत क्रिकेटविषयी विचारले. त्यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये त्यांनी माझे प्रदर्शन पाहिले आणि त्यांना ते आवडले. मला खुप चांगले वाटले की त्यांच्यासारखा दिग्गज मला ओळखतो.”
साकारियाने श्रीलंका दौऱ्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर चोरीचा आरोप, होऊ शकते पोलिस कारवाई
इंग्लंडमधील संघाची पोलखोल, माजी कर्णधारावर वर्णद्वेषाचे आरोप सिद्ध झाल्याने मागितली माफी