पुणे। समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धेत मौसम खत्री, सोमवीर, शिवराज राक्षे, नीलेश लोखंडे, कौतुक डाफळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून बाजी मारली.
फुरसुंगी येथे झालेल्या या कुस्ती स्पर्धेला १०० वर्षापेक्षा मोठी परंपरा असून, पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या मल्लांना एकूण ३० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.
यात मौसम खत्रीने भारत केसरी रुस्तम ए हिंद हितेशकुमारवर मात केली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला. नंतर नकारात्मक कुस्ती बघायला मिळाली. खडाखडीनंतर मौसमने एकदा हितेशला रिंगणाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. अखेर साडेतीन मिनिटानंतर मौसमने हितेशला चितपट करून बाजी मारली. मौसमला साडेतीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
यानंतर दुसरी कुस्ती भारत केसरी सोमवीर विरुद्ध वस्ताद सत्पाल यांचा पठ्ठा सत्येंद्र कुमार यांच्यात झाली. यात सोमवीरने सत्येंद्र कुमारवर गुणांनी मात केली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी जोर आजमावला. यानंतर सोमवीर आक्रमक झाला आणि सत्येंद्र विरुद्ध पहिला गुण घेत बाजी मारली आणि अडीच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
यानंतर तिसरी कुस्ती रंगली ती महाराष्ट्र केसरी बालारफीक शेख विरुद्ध पुण्याच्या गणेश जगताप यांच्यात. दोन्ही मल्लांनी तोडीस तोड कुस्ती केली. डाव-प्रतिडाव रंगले. मात्र, कोणालच वरचढ ठरता येत नव्हते. अखेर ही कुस्ती बरोबरीत सुटली. चौथी कुस्ती माउली जमदाडे विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, अवघ्या काही मिनिटांत शिवराज राक्षेने दुहेरी पट काढून माउली जमदाडेवर विजय मिळवून दीड लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. यानंतर मामासाहेब कुस्ती संकुलाचा मल्ल साईनाथ रानवडे आणि साता-याचा नीलेश लोखंडे यांच्यातही बराच वेळ खडाखडी झाली. अखेर नीलेशला साईनाथला नमविण्यात यश आले आणि त्याने दीड लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. दादा शेळकेने विनोदकुमारवर मात करून लाल आखाडा गाजविला.
यानंतर भारत मदाने विरुद्ध राजन तोमर यांच्यातील कुस्तीही लक्षवेधक ठरली. भारतने बॅक थ्रो डावावर राजन तोमरवर मात केली. यानंतर विजय गुटाळने गोकुळ आवारेवर पोकळ घिसा डावावर विजय मिळवला. सोलापूरच्या योगेश पवारसमोर पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालिमीच्या विलास डोईफोडेचा निभाव लागला नाही. योगेशने ८० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. संतोष दोरवड आणि अतुल पाटील यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. कौतुक डाफळे याने तानाजी झुंझुरकेवर मात केली. सिंकदर शेखने तानाजी फडतरेवर विजय मिळवला.