टी20 क्रिकेटमध्ये मोठ-मोठ्या गोलंदाजांना नेस्तनाबूत करणार सूर्यकुमार यादव संदीप शर्मासमोर मात्र सपशेल अपयशी ठरतो. सूर्या संदीपसमोर काहीच करू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात संदीप शर्मानं मुंबईच्या या स्टार फलंदाजाला पुन्हा एकदा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 38 वा सामना खेळला गेला. मुंबईची प्रथम फलंदाजी होती. सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ट्रेंट बोल्टविरुद्ध दमदार चौकार मारून डावाची सुरुवात केली. मात्र संदीप शर्मासमोर त्याचं काही एक चाललं नाही. संदीपनं चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमारला रोव्हमन पॉवेलच्या हाती झेलबाद केलं. सूर्या 8 चेंडूत 10 धावा करून तंबूत परतला.
आकडेवारीवर नजर टाकली, तर संदीप शर्मा सूर्यकुमार यादववर किती भारी आहे हे लक्षात येतं. हे दोघं एकूण 8 डावात एकमेकांसमोर आले आहेत. या दरम्यानं सूर्यानं 33 चेंडू खेळले असून त्याच्या बॅटमधून केवळ 32 धावा निघाल्या आहेत. विशेष म्हणजे, संदीपनं त्याला चार वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. आयपीएलमध्ये सूर्याला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम आता संदीप शर्माच्या नावावर नोंदवला गेला आहे.
संदीप शर्मानं या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत केवळ 18 धावा देऊन मुंबईचे 5 गडी बाद केले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. संदीप शर्मानं सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड आणि जेराल्ड कोइत्झे यांच्या विकेट घेतल्या.
संदीपच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, पंजाबच्या या 30 वर्षीय गोलंदाजानं 119 सामन्यांमध्ये 130 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 26.72 आणि इकॉनॉमी रेट 7.84 एवढा राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी! बनला आयपीएलमध्ये 200 विकेट पहिला गोलंदाज
आयपीएल 2024 चा सिक्सर किंग कोण? कोणी लगावलाय सर्वात लांब षटकार? जाणून घ्या टॉप-5 फलंदाज
बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, विराट कोहलीला बीसीसीआयनं ठोठावला मोठा दंड