आयपीएल 2024 चा 38वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. राजस्थाननं या सामन्यात मुंबईचा अगदी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं 20 षटकांत 9 विकेट गमावून 179 धावा बनवल्या होत्या. मुंबईला या धावसंख्येपर्यंत रोखण्यात सर्वात मोठं योगदान होतं ते वेगवान गोलंदाज संदीप शर्माचं. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्यानंतर तो भावूक झाला होता.
मुंबई इंडियन्सविरुद्ध संदीप शर्मानं 4 ओव्हरमध्ये 18 रन देऊन 5 विकेट घेतल्या. या सामन्यात संदीपनं 5.40 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीनं गोलंदाजी केली. त्यानं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी यांना आपलं शिकार बनवलं. मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणाऱ्या संदीप शर्मानं आपली व्यूहरचना सांगितली. तो म्हणाला की, “मी फिट झाल्यानंतर माझा पहिला सामना खेळत होतो. आता चांगलं वाटत आहे. खेळपट्टी संथ होती. त्यामुळे माझी योजना व्हेरिएशन करण्याची आणि कटर बॉल टाकण्याची होती.”
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, संदीप शर्मा आयपीएलच्या लिलावामध्ये अनसोल्ड राहिला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “दोन वर्षांपूर्वी मला कोणीच खरेदीदार नव्हता. मला रिप्लेसमेंट म्हणून संघात घेण्यात आलं. म्हणून मी प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे.”
View this post on Instagram
संदीप शर्माला पंजाब किंग्जनं 2022 मध्ये रिलिज केलं होतं. यानंतरच्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सनं त्याचा जखमी प्रसिद्ध कृष्णाच्या जागी 50 लाख रुपयांमध्ये संघात समावेश केला.
राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 179 धावा केल्या. राजस्थानकडून संदीप शर्मानं 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात, राजस्थाननं हे लक्ष्य 18.4 षटकांत केवळ 1 विकेट गमावून गाठलं. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालनं 60 चेंडूत नाबाद 104 धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालचं तुफानी शतक, राजस्थानचा मुंबईवर खूप मोठा विजय
छोटा पॅकेट, मोठा धमाका! राजस्थानविरुद्ध संकटमोचक बनून आला तिलक वर्मा, ठोकलं झंझावाती अर्धशतक
संदीप शर्मा समोर येताच सूर्या विसरतो बॅटिंग! आकडेवारी एवढी खराब की विश्वासच बसणार नाही