भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर व भारताचा अव्वल अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामध्ये सातत्याने तूतू-मैंमैं होत असल्याचे जगजाहीर आहे. मांजरेकर हे थोड्या-थोड्या कालावधीने जडेजावर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा मांजरेकर यांनी रवींद्र जडेजाबाबत एक महत्त्वाचे भाष्य केले आहे.
रवींद्र जडेजा मागील काही काळापासून म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही.अनेक वर्षांपासून जडेजा जेव्हा अपयशी ठरतो, तेव्हा माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर हे त्याच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आगामी आशिया चषकाबाबत भारतीय संघ व रवींद्र जडेजाबाबत विचारले असता पुन्हा एकदा मांजरेकर यांनी जडेजाला लक्ष्य केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मांजरेकर म्हणाले,
“आता जडेजालाही माहीत असेल की त्याच्यापुढे मोठे आव्हान आहे. त्याला आता निवडकर्त्यांनाच सांगावे लागणार आहे की, तो संघात फलंदाजी अष्टपैलू की गोलंदाजी अष्टपैलू म्हणून खेळणार आहे. ही गोष्ट ज्यावेळी पूर्णपणे स्पष्ट होईल तेव्हा त्याची संघातील जागा पक्की होईल. फलंदाजी अष्टपैलू म्हणून तो संघात सामील झाल्यास त्याला हे सिद्ध करावे लागेल की, तो कार्तिक किंवा हार्दिकच्या जागी सहाव्या-सातव्या स्थानावर खेळू शकतो.”
जडेजा आणि अक्षर पटेल यांची तुलना करताना सध्याच्या फॉर्मनुसार अक्षर काहीसा उजवा असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र, फलंदाजीच्या बाबतीत जडेजा जास्त सरस असेल अशी देखील टिप्पणी त्यांनी जोडली.
आगामी आशिया चषक व टी२० विश्वचषकात भारतीय संघाला जडेजाकडून मोठ्या अपेक्षा असतील. जडेजा यशस्वी ठरल्यास तसेच तो फॉर्ममध्ये असल्यास भारतीय संघाला बळकटी येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज