काही दिवसांपूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने १-०ने मालिकेत आघाडी मिळवली आहे. या सामन्यानंतर आता दोन्ही संघ मेलबर्नमध्ये होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान हा सामना होणार आहे. तत्पूर्वी माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला सरावासंदर्भात महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
प्रसिद्ध समालोचक मांजरेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे भारतीय संघाला सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मिळालेल्या कालावधीत सर्व भारतीय फलंदाजांना खासकरुन रहाणेला एका गोष्टीचा जास्त सराव करायचा आहे. तुम्ही जेवढे शक्य होतील तेवढे अधिक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा. सराव सत्रातही फुल आणि शॉर्ट चेंडूचा सामना कसा करायचा? तसेच बचावात्मक फलंदाजी कशी करायची?, या गोष्टींवर अधिक लक्ष द्या.”
https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1340852489743056897?s=20
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजाची दयनीय स्थिती
ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अत्यंत वाईट फलंदाजी प्रदर्शन केले होते. पहिल्या डावात भारताकडून एकट्या विराट कोहलीने ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८ चौकारांच्या मदतीने ७४ धावांचा आकडा गाठला होता. परंतु रहाणेच्या चुकीमुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली होती. मात्र, दुसऱ्या डावात विराटदेखील जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. विराटसह भारतीय संघातील इतर खेळाडू १० धावांच्या आतच बाद झाले आणि फक्त ३६ धावांवर त्यांना डाव घोषित करावा लागला.
..म्हणून करावे लागणार भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल
पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट पालकत्त्व रजेमुळे मायदेशात परतणार आहे. त्यामुळे भारताला विराटविना उर्वरित सामने खेळावे लागणार आहेत. याच सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे शमीदेखील उर्वरित मालिकेचा भाग नसेल. अशात विराटच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलला सहाव्या क्रमांकावर संधी मिळणार असल्याची चर्चा चालू आहे. तसेच पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना संघातून वगळून केएल राहुल आणि रिषभ पंतला सामील केले जाण्याची दाट शक्यता आहे. शिवाय मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांपैकी एकाला शमीच्या जागी घेतले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संधी असूनही फायदा घेता येणार नाही, टीम इंडियाचे पुनरागमन अशक्य’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा दावा