मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा 14वा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
हार्दिक पांड्याला वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, अशी भीती आधीच होती, आणि झालंही तसंच. हार्दिक जेव्हा नाणेफेकीला आला, तेव्हा चाहत्यांनी त्याचं जोरदार बूइंग केलं. चाहते नाणेफेकी दरम्यान रोहित-रोहितच्या घोषणा देत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नाणेफेकीसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसोबत माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आले होते. मांजरेकर यांनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच चाहत्यांनी बूइंग करण्यास सुरुवात केली, ज्यावर संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मांजरेकर यांनी चाहत्यांना ‘चांगलं वागण्यास’ सांगितलं. नाणेफेकीच्या वेळी मांजरेकर म्हणाले, ” मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे”, ज्यानंतर प्रेक्षकांनी हूटिंग करण्यास सुरुवात केली. यावर मांजरेकर यांनी चाहत्यांना, उत्तर देताना ‘चांगलं वागा’ असा सल्ला दिला.
Sanjay Manjrekar asking Wankhede crowd to behave. pic.twitter.com/rxLRSO33yN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2024
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करत आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. मुंबईची या हंगामाची सुरुवात चांगली राहिलेली नाही. ते हंगामातील आपल्या पहिला विजयाच्या शोधात आहेत. पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरात टायटन्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव झाला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं त्यांचा 31 धावांनी पराभव केला.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ आज विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न करेल. राजस्थाननं पहिल्या सामन्याच लखनऊ सुपर जायंट्सचा 20 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला होता.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 –
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
इम्पॅक्ट प्लेअर्स – डेवाल्ड ब्रेव्हिस, नुवान तुषारा, रोमॅरियो शेफर्ड, नेहाल वढेरा, शम्स मुलानी
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक