भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गडी राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीपुढे भारतीय फलंदाजांची डाळ शिजली नाही आणि भारताला आतापर्यंतच्या सर्वात लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर, माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टीका केली आहे. रहाणेला आणखी जबाबदारी घ्यावी लागेल, असे मांजरेकर यांनी म्हटले.
रहाणे गोंधळलेला दिसला
पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावात संपुष्टात आला. भारताची ही आतापर्यंतची सर्वात नीच्चांकी धावसंख्या आहे. या डावात भारतीय उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा चार चेंडूंचा सामना करत एकही धाव न करता जोस हेजलवूडच्या चेंडूवर यष्टीरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन बाद झाला. रहाणेच्या या निराशाजनक कामगिरीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी रहाणेवर टीका केली. मांजरेकर म्हणाले,
“रहाणेची फलंदाजी पाहून मी काहीसा हैराण झालो. त्याचा पुढचा पाय पहा. त्याला कदाचित चेंडूची लांबी समजण्यात अडचण येत आहे. विराट कोहलीने ज्याप्रकारे स्वतःला पुढे झोकून दिले, त्याप्रकारे रहाणेला काहीतरी करायचे होते. मात्र, तो गोंधळलेला दिसला. तुम्ही बॅट पुढे करून, चेंडू त्यावर लागेल अशी अपेक्षा करू शकत नाही.”
रहाणेने आणखी जबाबदारी घ्यावी
सोनी स्पोर्ट नेटवर्क या क्रिकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर बोलताना मांजरेकर पुढे म्हणाले, “रहाणे आता जवळपास ७० कसोटी खेळला आहे. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूने दबावाच्यावेळी पुढे येऊन चांगली कामगिरी करायला हवी. जबाबदारी घेऊन विहारीसारख्या खेळाडूपेक्षा त्याच्या नावे अधिक धावा हव्या.”
उर्वरित मालिकेत रहाणे करणार भारताचे नेतृत्व
रहाणेने ऍडलेड कसोटीच्या पहिल्या डावात ४२ धावांची खेळी केली होती. विराट कोहलीला धावबाद केल्याने त्याच्यावर अनेकांनी रोष व्यक्त केलेला. दुसऱ्या डावात रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. विराट कोहली पालकत्व रजेमुळे भारतात परतल्यानंतर, रहाणे उर्वरित तीन कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व करेल.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस






3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर