व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. पुढील हंगामापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी पुढील हंगामात व्यंकटेश अय्यरला १२ ते १४ कोटी मिळू शकतात अशी आशा व्यक्त केली आहे. २६ वर्षीय डावखुरा फलंदाज अय्यर हा वेगवान गोलंदाजी देखील करतो. चालू हंगामापासून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
संजय मांजरेकर यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, व्यंकटेश अय्यरवर लिलावातील सर्व संघांच्या नजरा राहतील. ते म्हणाले, ‘मी साधारण १२ ते १४ कोटी रुपयांचा विचार करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याची सरासरी ४७ आणि स्ट्राईक रेट ९२ इतका राहिला आहे. ही त्याची देशांतर्गत टी -२० क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी आहे. यात आयपीएलचा समावेश नाही. त्याच्याकडे गोलंदाजीची उत्कृष्ट कला आहे. अशा स्थितीत त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते.’
संजय मांजरेकर पुढे म्हणाले की, जर तुम्ही त्याची फलंदाजी बघितली तर तो बॅकफूटवर खूप चांगली फलंदाजी करतो. पुल आणि कट देखील खेळतो. तो असा फलंदाज आहे जो खेळपट्टीवर पुढे न जाता मोठा फटका खेळत आहे. मी त्याला टी -२० चा गेम चेंजर म्हणून पाहत आहे. त्याने गेल्या काही आठवड्यांत उत्तम खेळ दाखवला आहे. एकंदरीत त्याला भविष्यात चांगले दिवस येतील.
व्यंकटेश अय्यरला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आरसीबीविरुद्ध ४१ धावांची आक्रमक खेळी खेळली. मुंबई इंडियन्सविरुद्ध ५३ आणि पंजाबविरुद्ध ६७ धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २ आणि पंजाबविरुद्ध एक विकेट घेतली. मध्यप्रदेशातील या फलंदाजाने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये १९८ धावांची मोठी खेळीही खेळली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या २४ वर्षीय ऋतुराजने लगावले विक्रमी शतक; रैना, विजयला पछाडले
गंभीरने नाव न घेता धोनीला म्हटले तथाकथित फिनिशर? भडकलेल्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप