भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावलं. पण दुसऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. ऑफ-स्टंपबाहेरील आपल्या कमकुवतपणावर मात करण्याचा मार्ग न शोधण्याच्या विराट कोहलीच्या जिद्दीमुळे त्याची फलंदाजी सरासरी 50 वरून 48.13 वर घसरली आहे, असं मत भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
कोहलीनं बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावून शतकांचा दीर्घकाळ चाललेला दुष्काळ संपवला. मात्र, शुक्रवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याला आपली लय राखता आली नाही. तो 7 धावा करून बाद झाला. कोहलीनं वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू छेडला आणि स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथनं त्याचा सोपा झेल घेतला.
कोहली बाद झाल्यानंतर मांजरेकर यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, “विराटची सरासरी 48च्या आसपास पोहोचण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची ऑफ-स्टंपबाहेरची कमजोरी. इतकंच काय, याला सामोरं जाण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब न करण्यावर तो ठाम आहे.”
काही वर्षांपूर्वीपर्यंत कसोटीत कोहलीची सरासरी 54-55 च्या आसपास होती, परंतु दीर्घकाळ मोठी खेळी न खेळल्यामुळे त्याची सरासरी 2022 मध्ये 50 च्या खाली गेली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेत 15.50 च्या सरासरीनं केवळ 93 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
जय शाह यांना धक्का! या मोठ्या संघटनेचं अध्यक्षपद हातून गेलं
ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज






