बंगळूरू। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघात आज बीसीसीआयने यष्टीरक्षक संजू सॅमसन ऐवजी उदयोन्मुख यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनची निवड केली आहे.
सॅमसनची याआधीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघात निवड झाली होती. मात्र तो खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी असलेल्या यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघाबाहेर पडावे लागले आहे.
ईशान किशनची कामगिरी:
सॅमसन ऐवजी निवड झालेला ईशान यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. या संघाकडून त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. त्याने 14 सामन्यात 275 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षण करताना 9 झेल आणि 2 यष्टीचीत असे एकूण 11 विकेट घेतल्या आहेत.
याबरोबरच त्याने 2016 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्वही केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम सामन्यात विंडिज संघाने भारताचा पराभव केला.
तसेच ईशानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 32 सामने खेळले असुन 41.11 च्या सरासरीने 2097 धावा केल्या आहेत.
शमीलाही दाखवला बाहेरचा रस्ता:
मागिल काही महिन्यांपासून बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसच्याबाबतीत कठोर निर्णय घेतले आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. परंतू शमी बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे.त्याच्या ऐवजी दिल्लीच्या नवदिप सैनीची निवड करण्यात आली आहे.
बंगळूरू येथील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय ‘अ’ संघाची तर शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध 14 जून ते 18 जून दरम्यान होत असलेल्या कसोटी सामन्यासाठी आणि जूलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघाची फिटनेस टेस्ट झाली.
महत्वाच्या बातम्या:
–फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी!
–291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर विंडिज संघाने केला हा कारनामा!
–सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!