इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने ४ धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचे तुफानी शतक मात्र व्यर्थ गेले. परंतु, या शतकासह त्याने एक खास विक्रम आपल्या नावे जमा केला.
संजूचे धमाकेदार शतक
पहिल्याच षटकात सलामीवीर बेन स्टोक्स शून्यावर बाद झाल्यानंतर संजू मैदानात उतरला. संजू या सामन्यात कर्णधार म्हणून प्रथमच खेळत होता. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्याने ६३ चेंडूमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा ठोकल्या. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना तो झेलबाद झाला.
संघ विजयी झाला नसला तरी, संजूने एका खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असलेल्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला. यापूर्वी अशी कामगिरी कोणीही करू शकला नाही.
श्रेयस अय्यरने २०१८ आयपीएल हंगामात प्रथम दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना नाबाद ९३ धावांची खेळी केली होती. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी सध्या मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार असलेला कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने २०१९ मध्ये कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळताना ८३ धावांची खेळी केलेली.
राजस्थानला पत्करावा लागला पराभव
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या ९१ व अष्टपैलू दीपक हूडाच्या ६४ धावांच्या जोरावर २२१ धावांची मजल मारली. राजस्थानसाठी पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
प्रत्युत्तरात खराब सुरुवातीनंतर कर्णधार संजू सॅमसनने शतक ठोकत एकहाती संघाची धुरा वाहिली. जोस बटलर (२५), शिवम दुबे (२३) व रियान पराग (२५) यांनी त्याला साथ दिली. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना तो वैयक्तिक ११९ धावांवर बाद झाला. राजस्थानचा पुढील सामना १५ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वाह राहुल! तेवतियाने घेतला बाऊंड्री लाईनवर डोळे दिपवणारा झेल, पाहा व्हिडिओ
‘…याचे सर्व श्रेय एमएस धोनीला’, बटलरने केले कौतुक
अविश्वसनीय! चेतन सकारियाने आयपीएल पदार्पणातच घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा भन्नाट झेल