यंदाच्या आयपीएल हंगामात, संजू सॅमसनने आपला नवीन संघ, चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिला सामना खेळला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात संजूची बॅट शांत राहिली आणि त्याला कोणतीही मोठी खेळी साकारता आली नाही.
रवींद्र जडेजाच्या बदल्यात (trade deal) चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झालेल्या संजू सॅमसनकडून खूप अपेक्षा होत्या. त्याला संघाचा प्रमुख चेहरा आणि एमएस धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला 7 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करता आल्या. राजस्थानच्या नँद्रे बर्गरने त्याला क्लीन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला.
या कामगिरीमुळे, प्रत्येक आयपीएल हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोठी खेळी साकारण्याची संजू सॅमसनची मालिका या वर्षी खंडित झाली आहे. मागील सलग सहा हंगामांमध्ये, त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात सातत्याने अर्धशतक किंवा त्याहून मोठी धावसंख्या उभी केली होती. 2020 ते 2025 या कालावधीत, त्याने प्रत्येक हंगामाची सुरुवात अत्यंत दमदार शैलीत केली होती.
2020 मध्ये, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अवघ्या 32 चेंडूंमध्ये 74 धावा केल्या होत्या. 2021 मध्ये, त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 63 चेंडूंमध्ये 119 धावांची धडाकेबाज खेळी साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 2022 आणि 2023 मध्येही त्याने आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्या-त्या हंगामात अनुक्रमे 55 धावांची खेळी केली. 2024 मध्ये, त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 82* धावांची नाबाद खेळी खेळली, तर 2025 मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 66 धावा केल्या होत्या.
गेल्या ६ वर्षांतील संजू सॅमसनची पहिल्या IPL सामन्यातील कामगिरी
74 (32) विरुद्ध सीएसके, 2020
119 (63) विरुद्ध पीबीकेएस, 2021
55 (27) विरुद्ध हैदराबाद, 2022
55 (32) विरुद्ध हैदराबाद, 2023
82* (52) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2024
66 (37) विरुद्ध हैदराबाद, 2025
6(7) विरुद्ध राजस्थान,2026
मात्र, 2026 च्या हंगामाची त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. नवीन संघ, नवीन भूमिका आणि प्रचंड अपेक्षा असूनही, त्याला आपल्या पहिल्याच सामन्यात निराशाच पदरी पडली. परिणामी, आता आगामी सामन्यांमध्ये संजू सॅमसन कशा प्रकारे दमदार पुनरागमन करतो, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





