यंदाच्या आयपीएल हंगामातील 62वा सामना राजस्थान राॅयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (RR vs CSK) संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा (Sanju Samson) एक प्रेमळ व्हिडिओ राजस्थान राॅयल्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संजूने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एक छोटासा चाहता संजू सॅमसनला ऑटोग्राफसाठी हाक मारतो. संजू त्याची हाक ऐकतो आणि क्षणाचाही विलंब न करता “हा छोटू, एक मिनीट एक मिनीट” असे म्हणत त्याच्याकडे जातो. संजू त्याला विचारतो, “राजस्थानचा फॅन आहेस का?” यावर तो छोटासा चाहता म्हणतो, “चेन्नई आणि राजस्थान दोन्हींचा” त्यानंतर संजू सॅमसन त्याला ऑटोग्राफ आणि त्याची कॅपदेखील त्याला देतो. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंत केले जात आहे.
2025च्या या आयपीएल हंगामात संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतीशी झुंजताना दिसला. त्याने यंदाच्या या आयपीएल हंगामात राजस्थानसाठी 9 सामने खेळले. यादरम्यान संजूने 140.39च्या स्ट्राईक रेटने 285 धावा केल्या. दरम्यान त्याची सरासरी 35.63 तर सर्वोच्च धावसंख्या 66 राहिली आहे. संजूने एक अर्धशतकही झळकावले आहे.




