आयपीएल 2025च्या 32व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला. दिल्लीने दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणाच्या अर्धशतकांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले, मात्र अखेरच्या टप्प्यावर दिल्लीच्या गोलंदाजांनी कमाल करत सामना बरोबरीत नेला.
कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूत 31 धावा फटकावल्या, पण त्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. राजस्थानला शेवटच्या षटकात फक्त 9 धावांची गरज असतानाही मिचेल स्टार्कच्या अचूक आणि वेगवान गोलंदाजीसमोर फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीने सामना बरोबरीत नेत सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली.
सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, “धावसंख्या कठीण नव्हती, पण शेवटच्या षटकात स्टार्कने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याने सामना आमच्या बाजूने झुकवला. मी माझ्या गोलंदाजांवर अभिमान बाळगतो.”
राजस्थानकडून संदीप शर्माने पॉवरप्लेमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. त्याच्याबद्दल संजू सॅमसनने म्हटलं, “संदीप गेल्या काही वर्षांपासून माझ्यासाठी सर्वोत्तम ओव्हर टाकतोय. जोफ्राने त्याला चांगली साथ दिली. पण शेवटी स्टार्कच्या त्या षटकाने आमचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.”
सुपर ओव्हरबद्दल बोलायचे झाले तर, राजस्थान रॉयल्सकडून शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग फलंदाजीसाठी आले, तर चौथ्या चेंडूवर रियान पराग धावबाद झाला. यानंतर यशस्वी जयस्वाल फलंदाजीला आला पण शेवटचा चेंडू हेटमायरने खेळला, ज्यावर जयस्वाल धावबाद झाला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने 11 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला, “मला आता बरे वाटत आहे. मी पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करू शकलो नाही कारण मला वेदना होत होत्या आणि मी परत येऊन फलंदाजी करण्यास तयार नव्हतो.






