सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४० वा सामना पार पडला. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानकडून खेळतांना कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक अर्धशतकीय खेळी केली आणि राजस्थानच्या डावाला आकार दिला. संजू सॅमसनने आपल्या खेळीने हैदराबादविरुद्ध एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
संजू सॅमसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळतांना आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने हैदराबादविरुद्ध आत्तापर्यंत ६१५ धावा केल्या आहेत. या यादीत तो प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन आहे. त्याने ५६६ धावा केल्या आहेत. त्याखालोखाल भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने ५६४ धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर ५३५ धावांसह सुरेश रैना आहे, तर पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स आहे. त्याने ५३० धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पहिली विकेट लवकर गेल्यानंतर कर्णधार संजूने यशस्वी जयस्वालसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. जयस्वालने ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार संजू शेवटच्या षटकापर्यंत मैदानात टिकून होता. त्याने ८२ धावांची दमदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने निर्धारित २० षटकात १६४ धावांपर्यंत मजल मारली असून हैदराबादला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला आहे.
राजस्थानने आतापर्यंत १० पैकी ४ सामने जिंकले असून अद्याप त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद संघासाठी यंदाची आयपीएल अत्यंत खराब राहिली आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात १० पैकी ८ सामने गमावले आहेत. हा सामना जिंकला असला, तरी प्लेऑफसाठी पात्र ठरणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हैदराबाद सोडून चेन्नई संघात जा…’, डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रिया
-हैदराबादविरुद्ध संजूची ८२ धावांची ‘कर्णधार खेळी’; ३ हजारी मनसबदार बनत धोनी, कोहलीच्या क्लबमध्ये सामील
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच