राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई विरुद्धच्या सामन्यात फारश्या लयीत दिसला नाही. आयपीएलच्या या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सॅमसननं चेन्नईविरुद्ध 19 चेंडूत 15 धावा केल्या. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याच्या बॅटमधून एकही चौकार निघाला नाही. सॅमसनला या सामन्यात जास्त धावा करता आल्या नसल्या तरी त्यानं स्वत:चा एक मोठा विक्रम मोडला आहे.
संजू सॅमसननं चालू हंगामात 12 सामन्यांमध्ये 60.75 ची सरासरी आणि 158.30 च्या स्ट्राईक रेटनं 486 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या कोणत्याही हंगामात या त्याच्या सर्वाधिक धावा आहेत. त्याचा यापूर्वीचा विक्रम 484 धावांचा होता, जो त्यानं 2021 च्या हंगामात रचला होता.
संजू सॅमसननं या आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच अर्धशतकी खेळी खेळल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 86 आहे. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहली (634 धावा) या लिस्टमध्ये अव्वल स्थानी आहे.
राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, संजू सॅमसनचा डाव वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंगनं 15व्या षटकात संपुष्टात आणला. सॅमसनला मोठा फटका मारायचा होता, परंतु स्लो बॉलमुळे चकमा खाऊन त्याचा शॉट थेट मिडऑफच्या दिशेनं ऋतुराज गायकवाडच्या हाती गेला. संजूनं बाद होण्यापूर्वी रियान परागसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. राजस्थानसाठी रियान परागं 35 चेंडूत सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं एक चौकार आणि तीन षटकार मारले.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 20 षटकांत 5 गडी गमावून 141 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांना मोठी खेळी खेळता आली नाही. यशस्वीनं 21 चेंडूत 24 तर बटलरनं 25 चेंडूत 21 धावा केल्या. ध्रुल जुरेलनं 18 चेंडूत 28 धावांचं योगदान दिलं. शुभन दुबे शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईसाठी सिमरजीत सिंगनं 26 धावांत 3 बळी घेतले. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तर तुषार देशपांडेनं 30 धावांत 2 गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या घरच्या मैदानावर राजस्थाननं जिंकला टॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या प्लेइंग 11