भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. प्रमुख भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात असताना शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला आव्हान देतोय. या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन याला स्थान मिळाले आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली. त्यानंतर आता त्याला संघातील आपल्या भूमिकेविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्याने उत्तर दिले आहे.
संजू सॅमसन हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आलाय. लखनऊ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, संजूने अखेरपर्यंत नाबाद राहत चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 63 चेंडूवर 86 धावा कुटल्या. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 30 धावा केल्या. या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याला संघातील आपल्या जागेविषयी विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना संजू म्हणाला,
“मागील वर्षभरापासून मी सातत्याने संघाच्या आसपास राहिलो आहे. संघ व्यवस्थापनाने मला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, ज्यावेळी तू खेळत असशील त्यावेळी अखेरपर्यंत थांबून सामना संपवण्याची जबाबदारी तुझी असेल.”
संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याच्याच नेतृत्वात यावर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला संघात पुनरागमनाची संधी देण्यात आलेली. त्याने पुनरागमन केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, निवड समितीने दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांच्यावर विश्वास दाखवला. संजूचा विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये देखील समावेश केला गेला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर