इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम संपल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. आयपीएलमधून बाहेर पडलेल्या भारतीय खेळाडूंनी विश्वचषकासाठीच्या बायो-बबलमध्येही प्रवेश केला असून, यामध्ये मुंबई इंडियन्सच्या सर्व सहा खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) व भारतीय संघ व्यवस्थापनाने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसन याला पुढील सूचना येईपर्यंत युएईमध्येच थांबण्यास सांगितले असल्याचे वृत्त समोर येत आहे.
राजस्थान रॉयल्स स्पर्धेबाहेर मात्र संजू युएईत
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलच्या साखळी फेरीतून बाहेर पडला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात यांना पराभव पत्करावा लागला होता. हा सामना ७ ऑक्टोबर रोजी खेळला गेलेला. त्यानंतर संघाचे इतर खेळाडू मायदेशी परतल्या आहेत. मात्र, राजस्थानचा संघनायक संजू सॅमसन हा अद्यापही युएईमध्येच आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार बीसीसीआयने संजू सॅमसन याला पुढील सूचना मिळेपर्यंत युएईमध्येच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. संजू आयपीएलच्या उत्तरार्धात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने ७ सामन्यात २०७ धावा काढल्या होत्या. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ८२ राहिलेली. या फॉर्ममूळे त्याला विश्वचषकासाठीच्या संघात समाविष्ट केले जाणार का? या चर्चेला उधाण आले आहे.
काही खेळाडू दुखापतग्रस्त आणि खराब फॉर्ममध्ये
विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त असून, काही खेळाडू खराब फॉर्ममध्ये आहेत. हार्दिक पंड्या याची बॅट संपूर्ण आयपीएलमध्ये शांत राहिली आहे. तर, ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी अखेरच्या काही सामन्यात चांगली फलंदाजी करत फॉर्ममध्ये आल्याचे निदर्शनास आणून दिले. रिषभ पंत हादेखील या आयपीएलमध्ये तितक्या लयीत दिसला नाही.