श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात आणखी एक बदल झाला आहे. 15 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये महत्त्वपूर्ण कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून भारताने श्रीलंका इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळला. त्यानंतर भारतीय अंतिम संघ जवळपास निश्चित झाल्याचे दिसले. साई सुदर्शनला संघातून वगळल्यानंतर सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकासाठी आपला दावा पक्का केला.
यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, कर्णधार शुभमन गिल आणि विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत हे पहिल्या पाच स्थानांसाठी निश्चित मानले जात आहेत. तर संघ व्यवस्थापनाला आता सहाव्या क्रमांकाची चिंता होती. त्यासाठी ध्रुव जुरेल एक उत्तम फलंदाज मानला जात होता, मात्र सराव सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली. आता संघात सरफराज खानचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे या जागेसाठी तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच गोलंदाजी फळीही जवळपास निश्चित झाली आहे.
सहाव्या स्थानासाठी ध्रुव-सरफराजमध्ये चुरस?
सराव सामन्यात निराशाजनक कामगिरी आणि सरफराजचे संघपुनरागमन यामुळे ध्रुवचे फलंदाजातील सहावे स्थान अडचणीत आले आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत सरफराज संघात परतला आहे. त्याच्याकडे स्वीप, रिव्हर्स स्वीप आणि फूटवर्कच्या सहाय्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
श्रीलंकेची फिरकी गोलंदाजी भारताला दबावात आणण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे पाहुण्या संघाला फिरकी गोलंदाजांची सामना करू शकतील अशा फलंदाजांची आवश्यकता आहे. त्यातच सरफराज फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करू शकतो. यामुळे 15 ऑगस्टच्या दिवशी संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार, ध्रुव की सरफराज हे पाहणे चुरशीचे ठरेल.
भारतीय गोलंदाजी
अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने संघपुनरागमन केले असून त्याचे सातवे स्थान निश्चित आहे. तसेच संघात कुलदीप यादव आणि मानव सुथार हे फिरकीपटूही सामील आहेत. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजने आपली जागा पक्की केली आहे. त्याने सराव सामन्यात बॉलिंग आणि बॅटिंगने लक्षवेधी कामगिरी केली. तसेच दुसऱ्या वेगवान गोलंदाजीसाठी भारताकडे गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा हे पर्याय उपलब्ध आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल/सरफराज खान, रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/ गुरनूर ब्रार






