बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोमानं तयारीला लागले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा युवा फलंदाज सरफराज खानला सराव सत्रादरम्यान कोपराला दुखापत झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी वाका येथे नेटमध्ये फलंदाजी करताना सरफराजसोबत ही घटना घडली.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सरफराज दुखापतीनंतर वेदनेनं विव्हळताना दिसतोय. तो उजव्या कोपराला धरून नेट्समधून बाहेर पडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरफराजची दुखापत गंभीर नाही. सरफराज नेट्समध्ये फलंदाजी करताना पहिल्यांदाच भारतीय उपखंडाबाहेर खेळत असल्याचं जाणवत होतं. तो शॉर्ट बॉल्स थांबवताना आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना मारताना दिसला, जे विकेट्सवर आदळत होते.
या युवा उजव्या हाताच्या फलंदाजाला पर्थ कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटीत खेळणार नाही. तो संघासह ऑस्ट्रेलियाला आलेला नाही. अशा स्थितीत यशस्वी जयस्वालला नवा सलामीचा जोडीदार मिळू शकतो. या जागेसाठी केएल राहुलच्या नावाची चर्चा असली, तरी त्याचा फॉर्म खूपच खराब आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या दोन अनौपचारिक कसोटीतही त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. संघात अभिमन्यू ईश्वरनच्या रूपानं आणखी एक पर्याय आहे.
सरफराजनं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावलं होतं. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये 37.10 च्या सरासरीनं 371 धावा केल्या आहेत. सरफराज खानला विदेशी भूमीवर स्वत:ला सिद्ध करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. चाहते आणि टीम मॅनेजमेंटला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता या मालिकेत त्याला किती सामने खेळायला मिळतात हे पाहाणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियात कोहलीला पाहण्यासाठी चाहते चक्क झाडावर चढले! VIDEO व्हायरल
“गंभीर-रोहितचं विराटशी जमत नाही, भारत अवघ्या चार दिवसांत हरणार”; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन या लीगमध्ये खेळणार! प्रथमच होतंय आयोजन