महिला टी20 विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती यूएईमध्ये खेळली जात आहे. स्पर्धेची सुरुवात शारजाहमधील ब गटातील सामन्यानं झाली, ज्यामध्ये बांगलादेश समोर स्कॉटलंडचं आव्हान होतं. या सामन्यात बांगलादेशच्या संघानं 16 धावांनी विजय मिळवला. स्कॉटिश संघ हा सामना नक्कीच हरला, परंतु त्यांची लेगस्पिनर अबताह मकसूद ही चर्चेचा विषय ठरली.
वास्तविक, अबताह हिजाब घालून मैदानात आली होती. सामन्यातील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. याआधी स्कॉटलंड संघाच्या फोटोशूट आणि सराव सामन्यात देखील ती हिजाब घालून मैदानात उतरली होती.
अबताह ही मूळची पाकिस्तानची आहे. तिच्या जन्मापूर्वीच तिचं कुटुंब पाकिस्तान सोडून स्कॉटलंडला गेलं होतं. अबताहचा जन्म 11 जून 1999 रोजी स्टॉटलंडची राजधानी ग्लासगो येथे झाला. ती उजव्या हाताचा लेग स्पिन गोलंदाजी करते. तिचं पूर्ण नाव अबताहर माहिन मकसूद आहे. अबताहनं वयाच्या 19 व्या वर्षी स्कॉटलंडकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
अबताहनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत स्कॉटलंडसाठी 8 एकदिवसीय आणि 54 टी20 सामने खेळले, ज्यामध्ये तिनं अनुक्रमे 19 आणि 54 बळी घेतले आहेत. स्कॉटलंडकडून खेळण्याव्यतिरिक्त अबताहनं लीग क्रिकेटमध्ये बर्मिंगहॅम फिनिक्सचं प्रतिनिधित्व केलंय, जो इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेत खेळतो.
महिला टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यातील अबताह मकसूदच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात तिला एकही बळी मिळाला नाही. बांगलादेशविरुद्ध तिनं 4 षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा दिल्या. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेश संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटिश संघाला 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. त्यांनी 16 धावांनी सामना गमावला. विश्वचषकाच्या ब गटात बांगलादेशशिवाय स्कॉटलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे.
हेही वाचा –
बाबर आझमनं पाकिस्तानचं कर्णधारपद का सोडलं? कोच कर्स्टन यांच्या अहवालात मोठा खुलासा
मुकेश कुमारचे 5 बळी, ऋतुराज गायकवाड फ्लॉप; इराणी चषकाच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं?
“हे पूर्णपणे खोटं आहे”, हरभजन सिंगच्या धोनीवरील वक्तव्यावर सीएसकेच्या स्टाफचं उत्तर